घरमहाराष्ट्रनाशिकशहीद जनार्दन ढोमसे अनंतात विलीन

शहीद जनार्दन ढोमसे अनंतात विलीन

Subscribe

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लासलगाव : निफाड तालुक्यातील उगांव येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (वय ३२) यांना जम्मू- काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले. त्यांना शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’ आदी घोषणांसह मरळगोई येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उगाव, मरळगोई तसेच लासलगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूने उगाव, मरळगोई व लासलगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहीद जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांचे पार्थिव लासलगाव शहरातील प. पू. भगरीबाबा मंदिर येथे आणण्यात आले. फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रेला प्रारंभ होऊन लासलगाव शहराच्या मेनरोडमार्गे मरळगोई येथे दाखल झाली. अंत्ययात्रेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह लासलगाव, उगाव, मरळगोई व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा मरळगोई येथे पोहचल्यानंतर शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा पवन (वय 8) याने अग्नि दिला. यावेळी त्यांची पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ व कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांना भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी जि.प. सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, माजी पं.स. सदस्य शिवा सुरासे, मरळगोईचे सरपंच निवृत्ती जगताप, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल वाघ, उगावचे माजी उपसरपंच साहेबराव ढोमसे, शिवसेनेचे प्रकाश पाटील, वसंत पवार, शिवाजी सुपनर आदींनी शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

याप्रसंगी उगावचे मधुकर ढोमसे, दत्ता ढोमसे, ज्ञानेश्वर ढोमसे (चुलते), बाबूराव ढोमसे (आजोबा), प्रभाकर मापारी, भास्करराव पानगव्हाणे, माधवराव चव्हाण, अ‍ॅड. रामनाथ शिंदे, शिवा ढोमसे, मनोज पानगव्हाणे, मधुकर गवळी, संजय वाबळे, दत्तात्रय सुडके, बाळासाहेब होळकर तसेच लासलगाव, मरळगोई व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -