घरदेश-विदेशमास्क बंधनकारक, दारु,गुटखा, तंबाखूवर बंदी

मास्क बंधनकारक, दारु,गुटखा, तंबाखूवर बंदी

Subscribe

लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी

करोनाचा वाढता संसर्ग पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात सरकारकडून देण्यात येणार्‍या सूचनांचे कठोर पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून यासंबंधित तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे बुधवारी जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी चेहरा झाकणे म्हणजे मास्क घालणे बंधनकारक केले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्वांनुसार सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येणार नाहीत, यासाठी जिल्हा दंडाधिकार्‍याने नियमन करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर दंड आकारण्यात यावा. दारू, गुटखा, तंबाखूची विक्री बंद ठेवण्यात यावी यासह अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

- Advertisement -

दुसर्‍या टप्प्यात आजपासून (१५ एप्रिलपासून) या गोष्टींवर निर्बंध
पूर्ण देशात रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीवर बंदी, शाळा, महाविद्यालय, कंपन्या, रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम बंद, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणे बंधनकारक, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तीन मेपर्यंत बंद, देशात तीन मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद, रस्त्यावर थुंकल्यावर दंड, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यावर कारवाई, हॉटस्पॉट क्षेत्रात केवळ आवश्यक सामग्रीचीच उपलब्धता, दारू, गुटखा, तंबाखू विक्रीवर कडक बंदी असावी.

करोना नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलनंतरची अंमलबजावणी
आयटी कंपन्या ५० टक्के कर्मचार्‍यांसह काम करू शकतील, शेतीशी संबंधित सर्व व्यवहारांना सूट, ग्रामीण भागातल्या काही उद्योगांनाही सूट, मनरेगाची कामे चालूच राहणार, ई-कॉमर्स कंपन्यांनाही काम करण्याची परवानगी, कुरिअर सेवांना काम करण्याची परवानगी, लॉकडाऊन अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल आणि लॉज सुरू करणार, मोटर मेकॅनिक, कार पेंटर, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर लोकांना काम करण्याची परवानगी, सेझमधील उद्योगांना काम करण्याची परवानगी, गावांमध्ये रस्ते आणि इमारत बांधकामांना परवानगी, कामाच्या ठिकाणी शिफ्टमध्ये एक तासाचा ब्रेक असावा, ज्यांची मुले पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत अशा कामगारांना शक्यतो वर्क फ्रॉम होम द्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -