घरमहाराष्ट्रकोविड सेंटरमधील कंत्राट महापौरांच्या मुलाला मनसेकडून भ्रष्टाचाराचा आरोप

कोविड सेंटरमधील कंत्राट महापौरांच्या मुलाला मनसेकडून भ्रष्टाचाराचा आरोप

Subscribe

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट आपल्या मुलाच्या कंपनीला दिले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. कोविड काळात कुणीही राजकारण करू नका, असे वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करू नका, भ्रष्टाचार करा, असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरू आहे, असा घणाघाती आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोविड सेंटरच्या नावाखाली शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरू आहे याचा जाब मनसे विचारणार, असे त्यांनी सांगितले आहे.

गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेने थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. वरळी भागातील कोविड सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करून देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौरांच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

- Advertisement -

महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आले, असे ते म्हणाले. कोविड काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोरोना काळात राजकारण करू नका पण भ्रष्टाचार करा, असे कामकाज करणार असाल तर मनसे गप्प बसणार नाही. भ्रष्टाचाराविरोधात मनसे कायम आवाज उठवणार आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनीही हा मुद्दा सभागृहात उचलून धरावा, असे आवाहन मनसेने केले आहे. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी हेदेखील उपस्थित होते.

- Advertisement -

महापौरांकडून आरोपांचे खंडन
महापौर पेडणेकर यांनी तात्काळ या आरोपांचे खंडन केले आहे. मुंबईतील कोविड सेंटरला मनुष्यबळ पुरविण्याचे काम अनेक कंपन्यांनी केले आहे. त्यात माझ्या मुलाचीही एक कंपनी आहे. माझा मुलगा सज्ञान आहे. गेली दहा वर्षे तो व्यवसाय करत आहे. काम मिळविणे हा त्याचा हक्क आहे. कोणाला यात काही संशय येत असेल तर त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी करावी, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -