घरमहाराष्ट्रनाशिकखड्डेमुक्ती, धूर फवारणीसाठी मनसेच 'ढोलबजाव' आंदोलन

खड्डेमुक्ती, धूर फवारणीसाठी मनसेच ‘ढोलबजाव’ आंदोलन

Subscribe

नाशिक : शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पडलेले खड्डे, तसेच जुलै महिना संपत आला तरी धूर फवारणी होत नसल्याच्या निषेधात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर फुल वाहत ढोलताश्यांच्या गजरात महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांना निवेदन देत. तात्काळ धूर फवारणीबाबत उपाययोजना करावी तसेच शहर खड्डेमुक्त करावे असा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

मोसमच्या पहिल्याच मोठ्या पावसात नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली यातून रस्त्यांच्या दर्जाबाबत मोठा प्रश्न उपस्थित राहतोय. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदतीपर्यंत संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमताने दरवर्षी पावसाळ्या अगोदर रस्ते डांबरीकरणाची मलई खाऊन परत पावसाळा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी दिलेल्या निवेदनात मनसेच्या वतीने करण्यात आला.

- Advertisement -

मनसेच्या सत्ताकाळात राज ठाकरे यांनी अधिकारी व ठेकेदार यांना दिलेल्या निर्देशामुळे तसेच सक्त तंबीमुळे २०१२ ते २०१७ याकाळात शहरातील रस्त्यांची स्थिती उत्तम होती. मात्र त्यानंतर रस्त्याच्या कामांबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करून नाशिक खड्डेमुक्त करावे. तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित ठेकेदारांना दोषी धरून त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्याच सोबत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून कामात कुचराई केल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.

धूर फवारणी तात्काळ सुरू करण्याचीही मागणी

शहरात धूर फवारणी होत नसल्याने रोगराई वाढली आहे. डेंग्यू व स्वाईनफ्ल्यू सारख्या रोगांनी डोकं वर काढलं आहे. याबाबतही मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले. शहरातील सर्वच विभागात तात्काळ धुरफवारणी व औषध फवारणी सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

शहरात पावसाळा सुरू झाला की अनेक साथीचे आजार डोकं वर काढतात. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार फक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येच तब्बल ३हजाराहून अधिक ताप सदृश्य रुग्ण फक्त मागच्या महिन्यात भरती झाले होते. त्यानंतर शहरात मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यानंतर तापसदृश्य डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू अश्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. तरीही महानगर पालिकेच्या वतीने अजूनही धूर फवारणी व औषध फवारणी करण्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. तसेच मागील काही दिवसात शहरातील काही नागरिकांचा बळी या साथीच्या रोगामुळे झाला असल्याचा आरोप माजी नगरसेविका अर्चना जाधव यांनीं केला. दरम्यान, शहरात तात्काळ धुरफावरणी, औषध फवारणी आणि जनजागृती कार्यक्रम सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गेटवर मनसेसैनिक आणि सुरक्षा रक्षकांची खडाजंगी

मनसे कार्यकर्ते रस्त्यावर फुल उधळत आणि ढोल वाजवत महापालिका मुख्यालयासमोर पोहचले. यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते शांततेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जात होते. मात्र महानगरपालिकेच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी गेटच बंद करून घेतले. ‘आमचं आंदोलन गेटबाहेरच संपले आहे, आता आम्हाला शांततेत आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जाऊ द्या’ अशी विनंती करूनही सुरक्षा रक्षकांनी गेट बंद करून, ‘तुम्हाला आत सोडता येणार नाही’ असे फर्मान सोडले. यामुळे सुरक्षा रक्षक आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात मोठी खडाजंगी झाली. यावेळी झालेल्या गेटच्या ढकलाढकलीत काही महिला पदाधिकाऱ्यांना दुखापत झाल्याने मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि गेट लोटून त्यांनी आत प्रवेश मिळवला. दरम्यान दोन्ही बाजूने काही शाब्दिक चकमकीही झाल्या. यापार्श्वभूमीवर महापालिकेने तात्काळ पोलिसांना मुख्यालयात पाचारण केले होते. मनसेच्या या आंदोलनामुळे महानगरपालिका मुख्यालयातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

पोलिसांना करावे लागले पाचारण

प्रवेशद्वारावर मनसे सैनिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाली. यानंतर मनसेसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर त्यांना आयुक्त नसल्याने अतिरिक्त आयुक्तांना भेटावे लागले. त्यांच्याही केबिनचा दरवाजा उघडायला वेळ लागत होता. त्यामुळे केबिन बाहेरच पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू झाले. यावेळी मनसे सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण पालिका मुख्यालय दणाणून सोडलं. यामुळे त्याठिकाणी वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं. म्हणून महापालिका प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं.

शहरात धुरफावरणी, औषध फवारणी तसेच जनजागृतीसाठी तात्काळ निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रोगराईबाबत मलेरिया विभागाला तात्काळ कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. डेंग्यू, स्वाईनफ्ल्यूचा प्रभाग शहरात अजूनतरी जास्त दिसत नाहीये, परंतु प्रशासन त्याबाबत सतर्क आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरवात केली आहे. : अशोक आत्राम, अतिरिक्त आयुक्त (शहर)

 

यंदाच्या वर्षी जुलै महिना संपत आला तरी अजूनही फवारणीचा ठेका देण्यात आलेला नाहीये. प्रशासन आरोग्याबाबत किती गंभीर आहे हे यातून दिसतंय. नव्या आयुक्तांनी याबाबत स्वतः लक्ष घालून तात्काळ शहरात फवारणी तसेच जनजागृती कार्यक्रम घ्यावा.: अर्चना जाधव, मा. नगरसेविका 

 

मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रवेशद्वाराबाहेर शांततेत आंदोलन करत होते. आमचा बाहेर निषेध नोंदवून झाल्यानंतर आम्ही शांततेत निवेदन देण्यासाठी आत येत होतो. मात्र  सुरक्षा रक्षकांनी अधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रवेशद्वार बंद करून घेतलं. तसेच आमच्या कार्यकर्त्यांसोबत झटापट केली. त्यात महिला पदाधिकारीही होत्या. ही अर्धांडशाही आहे. पुरुष सुरक्षा रक्षकांनी महिलांच्या अंगावर येण्याची हिम्मत केलीच कशी, आणि निवेदन द्यायला जायचं नाही ही कोणती हुकूमशाही आहे. याबाबत आयुक्तांनी आम्हला उत्तर द्यावे. : सुजाता डेरे, माजी नगरसेविका

 

शहरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघातांच प्रमाण वाढलं आहे. त्याचमुळे नवीन आयुक्तांच ढोलतश्याच्या गजरात स्वागत करून त्यांना या समस्येबाबत जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न होता. आज आम्ही शांततेने आंदोलन केले आहे. पुढील आठ दिवसात शहरातील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. : विजय अहिरे, मनसे शहर उपाध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -