घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकुटुंबाने बेदखल केल्याने मायलेकी बनल्या भिकारी

कुटुंबाने बेदखल केल्याने मायलेकी बनल्या भिकारी

Subscribe

नाशिक : संपत्तीच्या वादातून खून, हाणामार्‍या आणि रक्ताचीच नाती वैरी बनल्याच्या अनेक घटना आजवर उघड झाल्या आहेत. मात्र, याच संपत्तीमुळे नाशिकमधील मायलेकी थेट भिकारी बनल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दुर्दैव म्हणजे त्यातील वृद्धेची तरुण मुलगी मानसिक रुग्ण बनली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिकरोड भागात राहणार्‍या माया उदावंत या ६२ वर्षीय महिलेचा पहिला विवाह मोडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी नगर जिल्ह्यातील स्थळ वाहून विवाह लावून दिला होता. या ठिकाणीही नशिबाने त्यांची थट्टा केली. पतीने आत्महत्या केल्यानंतर त्या पुन्हा नाशिकला माहेरी परतल्या. प्रारंभी त्यांच्या वडिलांनी सांभाळ केल्यानंतर माया उदावंत जेलरोडवर स्वतंत्र खोली घेऊ राहू लागल्या. या ठिकाणीही त्यांचा भाऊ व भावजयीकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास सुरू होता. याच त्रासातून त्यांना बेघर व्हावे लागले. नगर येथील त्यांच्या एक गुंठा जागेची कागदपत्रेही पळवून नेल्याची व्यथा माया उदावंत यांनी अत्यंत हतबल अवस्थेत बोलून दाखवली.

- Advertisement -

कुटुंबियांच्या त्रासामुळे त्यांना बेघर व्हावे लागले. कपड्यांचे एक गाठोडे आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी घेऊन या आजी घराबाहेर पडल्या. नशिब नेईल तिकडे दाहीदिशा फिरत, मिळेल ते खाऊन पोट भरत आणि कधीतरी कुणाच्या कानी आपला आवाज पोहोचेल, न्याय मिळेल एवढ्या अपेक्षेवर त्यांनी रस्त्यावर दिवस काढले. तब्बल ६ वर्षांपासून या दोघीही भिकारी अवस्थेत नाशिकमध्ये राहताहेत. धर्मादाय आयुक्तालयातर्फे सुरू असलेल्या भिकार्‍यांच्या सर्वेक्षणात या मायलेकी भिकारी अवस्थेत सापडल्या. या दोघींवर नामको रुग्णालयात उपचार करण्यात आले. स्वतःची मालमत्ता परत मिळविण्यासाठी या दोघींचा संघर्ष आजही सुरू आहे. मारहाण आणि लहानपणीच आलेली विवंचना यामुळे तरुण मुलीच्या मनावर प्रचंड आघात झालेला आहे. तिच्यावर सध्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासन, धर्मादाय आयुक्त यांनी न्याय मिळवून द्यावा, एवढीच माफक अपेक्षा माया उदावंत यांनी माय महानगरशी बोलताना व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -