घरमहाराष्ट्रईडीचे नवीन कार्यालय इकबाल मिर्चीच्या जागेवर

ईडीचे नवीन कार्यालय इकबाल मिर्चीच्या जागेवर

Subscribe

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी इकबाल मिर्ची याच्या वरळी येथील सीजे हाऊस या ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे मुंबई विभागाचे कार्यालय स्थलांतरीत होत आहे. बॅलॉर्ड पियर या ठिकाणी वर्षेनुवर्षे असणारे ईडीचे कार्यालयाचे कामकाज लवकरच वरळी येथील सीजे हाऊसमधून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक दिग्गज नेत्यांची चौकशी झाल्यामुळे बॅलॉर्ड पियर याठिकाणी असलेले ईडीचे कार्यालय मागील दोन वर्षांपासून चर्चेत आले होते.

ईडीचे नवीन कार्यालय ज्या ठिकाणी येत आहे, ती जागा ड्रग्स तस्कर इकबाल मिर्ची याची आहे. वरळीतील प्राईम लोकेशन असलेल्या सीव्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन ही १५३७ चौरस मीटरची जागा खरेदी करताना गैरव्यवहार झाला होता. इकबाल मिर्ची याची पत्नी हाजरा मेनन आणि तिची दोन मुले असिफ आणि जुनैद यांनी सीजे हाऊसमध्ये दोन मजले खरेदी केले होते आणि ते एका खासगी कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आले होते.

- Advertisement -

ईडीने २०१९ मध्ये इकबाल मिर्ची याचे कुटुंब आणि इतरांवर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकणात मिर्ची याच्या दोन सहकार्‍यांसह तीन बांधकाम व्यावसायिकांनाही ईडीने अटक केली होती. गेल्या वर्षी ईडीने सीजे हाऊसमध्ये असणार्‍या कंपनीला विनंती करून ती जागा ताबडतोब खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. जुलै २०२१ मध्ये ईडीने त्या जागेचा ताबा घेतला होता.

या जागेत आता ईडीचे कार्यालय तयार आहे. या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ९ हजार स्क्वेअर फूट आणि चौथ्या मजल्यावर ५ हजार स्क्वेअर फुटांचे फ्लॅट आहेत. यातच ईडी आता आपले कार्यालय बनवत आहे. लवकरच ईडीचे बॅलॉर्ड पियर येथील कार्यालय वरळीच्या सीजे हाऊस या ठिकाणी शिफ्ट होणार आहे. यापूर्वी ईडीने इक्बाल मिर्चीच्या एकूण ७ मालमत्ता जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये पाचगणी, महाबळेश्वरमधील एक हॉटेल, एक निर्माणाधीन हॉटेल, एक सिनेमा हॉल, १ फार्म हाऊस, २ बंगले आणि साडेतीन एकर जागेचा समावेश आहे. २०१३ मध्ये इकबाल मिर्ची याचा लंडनमध्ये मृत्यू झाला आहे. इकबाल मिर्चीची पत्नी आणि दोन मुलांविरूद्ध इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -