घरमहाराष्ट्रमुंबईकरांनो गुडन्यूज! मेट्रोची 2 आणि 7 मार्गिका 19 जानेवारीपासून होणार खुली; वाचा सविस्तर

मुंबईकरांनो गुडन्यूज! मेट्रोची 2 आणि 7 मार्गिका 19 जानेवारीपासून होणार खुली; वाचा सविस्तर

Subscribe

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणि आसपासच्या शहरांत 350 किमीहून अधिक लांबीचे मेट्रो नेटवर्क उभं करण्याचं शासनाचं नियोजन आहे. एमएमआरडीएच्या या मेट्रो नेटवर्कमुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे. मात्र मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोच्या आत्तापर्यंत फक्त दोन मार्गिकाचं दाखल झाल्या आहेत. पण मुंबईकरांसाठी आता मेट्रोबाबत एक गुडन्यूज समोर आली आहे. 19 जानेवारीपासून मेट्रो 2 अ ( दहिसर- डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 ( दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव- गुंदवली हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी रोजी या मार्गाचं लोकार्पण होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणनेही जय्यत तयारी केली आहे.

दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर आता पश्चिम दुर्तगती मार्गावरील आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि सुसाट होणार आहे. मेट्रोचा ट्विन लाइन्स 2 ए आणि 7 हा एकच कॉरिडॉर आहे. याचा डेपो चारकोप इथे आहे. मेट्रो स्थानकामध्येही इतर सोयी सुविधांना फायनल टच दिला जात आहे.

- Advertisement -

‘मेट्रो 2 अ’ चा मार्ग आणि स्थानकं

मेट्रोची 2 अ अर्थात दुसरा टप्पा दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत असेल. यासाठी जवळपास 6410 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मार्गाची लांबी 18.6 किलोमीटर इतकी असून या मार्गावर 17 स्थानकांवर थांबा असणार आहे. अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर या ठिकाणी थांबा असेल.

‘मेट्रो 7’ चा मार्ग आणि स्थानकं

मेट्रो लाइन 7 हा अंधेरी ते दहिसरपर्यंत असणार आहे. हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेससह 16.5 किलोमीटरपर्यंत आहे. यासाठी 6208 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. या मेट्रो मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. गेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल.

- Advertisement -

मुंबई मेट्रो लाइन – 2 अ दहिसरला डीएन नगरशी जोडते तर लाइन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडते. दरम्यान मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी 14 मेट्रो मार्गिकांचे 337 किमी लांबीचे जाळे विस्तारले जात आहे. यात आता मेट्रो 2 अ आणि मेट्रो लाईन 7 चा समावेश झाला आहे.

या लाइनवरील दहिसर – डहाणूकरवाडी- आरे असा 20 किमी लांबीचा पहिला टप्पा एप्रिल 2022 मध्ये प्रवाशांसाठी सुरु झाला, तर दुसरा टप्पा ऑगस्ट 2022 मध्ये पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणं अपेक्षित होते. मात्र याला विलंब झाला असून मुंबईकरांची मेट्रोने प्रवास करण्याची प्रतिक्षा लांबली आहे. पण आता काम आणि मेट्रोच्या सुरक्षा चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार, दोन ते तीन दिवसात मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. यानंतर पुढील आठवड्यात 19 जानेवारी रोजी दुसऱ्या टप्पा सुरु होईल, याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही. आर श्रीनिवास यांनी दिली आहे.


…अखेर कल्याण तळोजा मेट्रोसाठी 5800 कोटींचे टेंडर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -