घरमहाराष्ट्रहिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

हिंमत असेल तर शिंगावर घ्या; नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर प्रहार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ‘प्रहार’ या त्यांच्या वर्तमानपत्रातून जोरदार प्रहार केला आहे. हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा, असं खुलं आव्हान नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरुन राणेंनी टोला लगावला आहे. स्वर्गवासी साहेबांच्या भाषणाचा ध्वनीफिती पाहून त्यांची नक्कल करण्याचा केवीलवाणा प्रयत्न. एक वाक्याचा पुढच्या वाक्याशी संबंध नाही, असा टोला राणे यांनी लगावला.

“शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत ‘सामना’मध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही. मेळाव्याचे फोटो पाहिले. अंतर ठेवून बसलेले शिवसैनिक. अनेकांच्या डोळ्यांसमोर मोबाईल. हॉलमध्ये बसण्याची क्षमता किती? त्याच्या अर्ध्या संख्येमध्ये जल्लोष काय आणि दरारा काय? कोणाला दाखविता दरारा?” असं म्हणत राणेंनी थेट आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांनी हिंदुचत्वाच्या मुद्द्यावरुन देखील टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा, असं त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. त्यावरुन राणेंनी प्रहार केला. किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा? किती ही बनवाबनवी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद, असा हल्लाबोल राणेंनी केला.

संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत

“माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात व्हायचा. मेळाव्याला शिवाजी पार्कचे मैदान पुरत नसे. आत शिरायला जागा नसायची. या वेळेचा ‘ऐतिहासिक’ दसरा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये तुटपुंज्या सैनिकांच्या उपस्थितीत झाला. त्यात कसला जल्लोष आणि कसला दरारा! संजय राऊत हनुमंताचा गणपती करण्यात पटाईत! दांडग्या पैलवानासमोर अपंग माणसाला उभा करून ते त्याच्याही तोंडी शब्द घालतील, ‘या अंगावर!’” असा टोला राणेंनी संजय राऊत यांना लगावला.

- Advertisement -

वैयक्तिक रागापोटी नातेवाइकांवर अ‍ॅसिड फेकण्याची सुपारी

नारायण राणे यांनी पुन्हा एकदा घरातील व्यक्तीवर अ‍ॅसिड फेकण्याची सुपारी दिल्याचं म्हटलं आहे. पण यामध्ये त्यांनी कोणी कोणावर अ‍ॅसिड फेकायची सुपारी दिली त्या व्यक्तींची नावं मात्र दिलेली नाहीत. “अ‍‘सामना’च्या याच अंकात ‘फटकारे’ या मथळ्याखाली ‘… महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिला म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि प्रतिमेवर अ‍ॅसिड फेकता? कुठे फेडाल हे पाप!’ अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तर मग, वैयक्तिक रागापोटी, मालमत्तेच्या हव्यासापोटी घरातल्या नातेवाइकांवर अ‍ॅसिड फेकण्याची सुपारी दिली जाते. घरच्या माणसांवर अ‍ॅसिड फेकणाऱ्यांची ही कोणती संस्कृती? कुठे फेडाल हे पाप?” असा सवाल राणेंनी केला आहे.

प्रहारमधील लेखात राणेंनी पुढे म्हटलंय, या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘अक्करमाशा’, ‘निर्लज्जपणा’ असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी ‘सामना’मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आदर्श आत्मसात करून काम करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा ठेवता येत नाही, असं देखील राणे म्हणाले.

“शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना नाही वाढली. कोणाच्या गालाला पाच बोटे सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुसंस्कृत, कर्तबगार आणि अभ्यासू असावेत. अंगावर या, नामर्द, निर्लज्जपणा, अक्करमाशी अशी शिवराळ भाषा उसनं अवसान आणून वापरणारे नको,” असं नारायण राणे यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -