घरमहाराष्ट्रनाशिकनारीशक्ती : उत्तर महाराष्ट्रात महिला आमदारांचा वाढणार बोलबाला

नारीशक्ती : उत्तर महाराष्ट्रात महिला आमदारांचा वाढणार बोलबाला

Subscribe

१६ महिला उमेदवारांना मिळू शकते आमदारकीची संधी, महिला आरक्षणाने बदलणार राजकीय समीकरणे

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेत सध्या २४ महिला आमदार असल्या तरी, हे प्रमाण एकूण सदस्यसंख्येच्या ८.३३ टक्के आहे. महिला आरक्षण कायदा लागू झाल्यावर राज्यातील महिला आमदारांची संख्या किमान ९६ होईल. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता सध्या ६ महिला आमदार आहेत. आरक्षणानंतर ही संख्या १६ होईल. महिला आमदारांची संख्या वाढल्यास त्या तुलनेत महिला मंत्र्यांचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राज्य विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २४ तर, २०१४ मध्ये २० महिला आमदार निवडून आल्या होत्या. संसदेत मांडण्यात आलेल्या घटना दुरूस्तीनुसार विधानसभेत ३३ टक्के आरक्षण लागू झाले तर महाराष्ट्र विधानसभेतील ९६ जागा या महिला राखीव होतील. म्हणजेच किमान महिलांची टक्केवारी चौपटीने वाढेल. सर्वसाधारण मतदारसंघातून महिला आमदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे राजकारणात अनेक बदलांची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने या अधिनियमाचा उपयोग या निवडणुकीत होणार नाही, असे दिसते.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीत मात्र महिला आरक्षण विधेयक लागू होऊ शकते. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता सध्या ४७ पैकी ६ महिला आमदार आहेत. आरक्षण लागू झाल्यास महिला आमदारांची संख्या १६ होईल. सर्वसाधारण जागेवरही महिला उमेदवारांना संधी असल्याने हा टक्का अधिक वाढू शकतो. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात सध्या रावेर मतदार संघातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, नंदूरबारमधून डॉ. हिना गावित, तर दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार या महिलांना संधी मिळाली. २०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालाकडे नजर टाकली असता राजकारणात महिलांचा टक्का वाढताना दिसत आहे.

१७ व्या लोकसभेच्या निवडणूकीत इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक महिला खासदार निवडून आल्या आहेत. सर्व पक्षांच्या मिळून ७८ महिला खासदारांना लोकसभेत संधी मिळाली. यापूर्वीच्या लोकसभेत ६४ महिला खासदार होत्या. लोकसभेत यंदा महाराष्ट्रातून दोन नवीन महिला खासदार गेल्या आहेत. त्यात भाजपच्या दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. भारती पवार यांनी यापूर्वीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. यावेळी त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर भारती पवार निवडून आल्या. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात भारती पवार यांना केंद्रिय आरोग्यमंत्रीपदी संधी देण्यात आली. आता नारीशक्ती वंदन अधिनियमानुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आल्याने महाराष्ट्रातून महिला खासदारांची संख्या तीनने वाढणार आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातूनही अनेक इच्छुकांना भविष्यात संधी मिळू शकते.

- Advertisement -

उ. महाराष्ट्रातील महिला आमदार

  • प्रा. देवयानी फरांदे, नाशिक मध्य
  • सीमा हिरे, नाशिक पश्चिम
  • सरोज अहिरे, देवळाली
  • स्नेहलता कोल्हे, कोपरगाव
  • लता सोनवणे, चोपडा
  • मंजुळा गावित, साक्री

उ. महा. महिला खासदार

  • डॉ. भारती पवार (दिंडोरी)
  • डॉ. हिना गावित (नंदुरबार)
  • रक्षा खडसे (रावेर)

उ. महाराष्ट्रातील विधानसभा बलाबल

  • एकूण जागा : ४७
  • पुरूष : ४१
  • महिला : ०६
  • आरक्षणानंतर महिलांच्या जागेत १६ ने वाढ होण्याची शक्यता

महिला मुख्यमंत्री मिळणार ?

राज्यात १९७२ ते १९७७ या काळात सर्वाधिक म्हणजे २८ महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतक्या संख्येने महिला आमदार निवडून आलेल्या नाहीत. पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख असली तरी सुमारे सहा दशकांच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अद्यापही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. महाराष्ट्र विधानसभेतील महिला आमदार असलेल्या प्रतिभाताई पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद, मंत्री आणि देशातील सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती पदापर्यंत यशस्वी मजल मारली. आता महिला आरक्षणानंतर महिलांचा राजकारणातील टक्का वाढणार असला तरी, महिला मुख्यमंत्री मिळेल अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -