घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रस्पर्धा परीक्षेत पुन्हा 'हायटेक' कॉपी; कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या भरतीत प्रयत्न

स्पर्धा परीक्षेत पुन्हा ‘हायटेक’ कॉपी; कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या भरतीत प्रयत्न

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक या पदाकरीता टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी १०५ तर, सहायक अधीक्षकपदासाठी ५३ जागांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पुणे विद्यार्थी वस्तीगृह महाविद्यालयात या पदासाठी परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. याच परीक्षा केंद्रात शुक्रवार (दि. २२) रोजी एक परीक्षार्थी परीक्षा केंद्रात कॉपी करण्याच्या उद्देशाने मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पायातील सॅण्डलमध्ये लपवून घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सूरज विठ्ठलसिंग जारवाल (वय- २३, रा. जारवालवाडी (सागरवाडी), पो. धासला, ता. बदनापूर, जि. जालना) हा कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दुपारी १२:३० ते १४:३० वाजेच्या काळात परीक्षा देण्यासाठी आला होता. सर्व परीक्षार्थी हे परीक्षा केंद्रात दाखल होत असताना प्रत्येकाची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी केली जात होती. यावेळी संशयित आरोपी याची तपासणी करत असताना तो तेथून पळून जाऊ लागला असता इतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे परीक्षा केंद्रात वापरास बंदी असलेले व कॉपी करण्याच्या उद्देशाने आपल्या पायातील सॅण्डलच्या तळव्यामध्ये मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवून आणले होते.

- Advertisement -

तर, सँडो बनियान घालून त्याला आतील खिशाला छिद्र पडून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढता येईल अशी व्यवस्था केली होती. सुरक्षा रक्षकांनी वेळीच सतर्कता दाखवत पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी हायटेक कॉपीची घटना उघड केली आहे. यात संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस अधिक तपास करत आहे.

राज्य सरकारच्या ‘क’ व ‘ड’ वर्ग भरती प्रक्रियेत घडतात प्रकार

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या क व ड वर्गासाठी होणार्‍या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु या भरती प्रक्रियेत सर्रासपणे राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर हायटेक कॉपीचे प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे या कॉपी प्रकरणात विशिष्ट जिल्ह्यातील व एकमेकांच्या संपर्कातील परीक्षार्थी संशयित आरोपी सापडत आहे. त्यामुळे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

हायटेक कॉपीचे केंद्र

म्हसरूळ परिसरात टीसीएसकडून निवडण्यात आलेले परीक्षा केंद्र हे हायटेक कॉपीचे मुख्य केंद्र बनत चालले आहे. तलाठी भरती असो कि कृषी विभागाची भरती याच भागातील परीक्षा केंद्रांवर कॉपी करण्याचे आणि कॉपी करणारे पकडले जात आहे. त्यामुळे यात टीसीएसचे तसेच केंद्रातील कर्मचारी यांचे संगनमत तर नाही ना अशी शंका निर्माण होते आहे.

याच केंद्रावर पूर्वीही कॉपी प्रकाराची चर्चा

काही दिवसांपूर्वी याच परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीच्या पेपरमध्ये एका मुलीने अशाच प्रकारे कॉपी केल्याचा आरोप त्याच वर्गातील परीक्षार्थीने केला होता. परंतु, त्यावेळी संस्थेच्या माध्यमातून ही केवळ अफवा असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी त्यावेळीच सीसीटीव्ही तपासले असते तर तो प्रकारही उघड होऊ शकतो, असे त्या परीक्षार्थीचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -