घरमहाराष्ट्रपोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा बदलीसाठी अर्ज

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा बदलीसाठी अर्ज

Subscribe

नाशिक : पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस महासंचालकांकडे वैयक्तिक कारणास्तव साईड पोस्टिंग बदलीसाठी अर्ज दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा कायम पाठिंबा आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी दिली. त्यामुळे गृहविभागाकडून पोलीस आयुक्त पाण्डेय यांची बदली होणार की नाही, याबाबत नागरिकांसह पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलीस महासंचालकांकडे बदलीसाठी गोपनीय अर्ज केला होता. पण, अर्जाची बातमी बाहेर आली आहे. म्हणून त्यावर स्पष्टीकरण देत आहे. पोलीस महासंचालकांना आठ दिवसांपूर्वीच अकार्यकारी पदावर बदलीसाठी अर्ज केला आहे. वैयक्तिक कारणामुळे बदलीची मागणी केली आहे. त्याचा आपल्या कामाशी कुठलाही संबंध नाही. नाराज होण्याचे काही कारण नाही. कुठल्याही परिस्थितीत काम करण्याचे आम्हाला प्रशिक्षण मिळालेले आहे. नॅशनल पोलीस अकादमीत आयपीएस अधिकार्‍यांना चांगले प्रशिक्षण दिले जाते. कामात वरिष्ठ अधिकार्‍यांचे पाळबळ आहे. प्रोफेशनल कारणास्तव बदली मागितलेली नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचे अर्जात नमूद केले आहे. बदली मागण्यामागे राजकारण नाही किंवा कोणी तक्रार केली नाही म्हणून अर्ज दिला, असे काही नसल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.

- Advertisement -

दीपक पाण्डेय नाशिक पोलीस आयुक्तपदाच्या पदभारपासून कायम चर्चेत राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या सूचनेनुसार नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावेच लागेल, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भूमिका घेतल्याने ते देशभर चर्चेत आले. रंगपंचमीनिमित्त नाशिक शहरात रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा केला जातो. रहाडींसाठी पोलीस आयुक्तांनी आयोजकांना परवानगी घेणे बंधनकारक केले. तसेच, नववर्ष स्वागत समितीस गुढीपाडव्यानिमित्त परवानगी घेणे बंधनकारक केल्याने आयोजकांमध्ये पोलीस आयुक्यांबद्दल नाराजीचा सूर उमटला. नाशिक शहरात वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेणे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अनोख्या पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवली. नो हेल्मेट, दोन समुपदेश, नो हेल्मेट, नो पेट्रोल आणि नो हेल्मेट, शासकीय कार्यालयात प्रवेश नाही या मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट चालकास पेट्रोल दिल्यास पंपचालक व मालकावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे पोलीस आयुक्तांविरोधात पेट्रोलपंपचालक नाराज आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -