घरक्राइमटोळक्याचा तरुणाला ठार करण्यासाठी सिनेस्टाईल पिछा; भरवस्तीत थरार

टोळक्याचा तरुणाला ठार करण्यासाठी सिनेस्टाईल पिछा; भरवस्तीत थरार

Subscribe

नवीन नाशिक : दांडिया खेळताना झालेल्या वादावरून एका युवकाला मारण्यासाठी १५ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे, तलवार, लाकडी दांडके घेऊन रस्त्यावर येत शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि.२) रात्री ११ वाजेदरम्यान राजरत्नगर, लोकमान्यनगर येथे घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पंधरा जणांचे टोळके या युवकाच्या मागे लागलेले असताना सदर युवक या गुंडांपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरात लपल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एकामागे एक घडणार्‍या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कायम आहे.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा दिवसापूर्वी दत्तनगर भागात सुमारे २५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रे हातात घेऊन परिसरात दगडफेक करीत दहशत निर्माण केली होती. त्यानंतर याच ठिकाणी दुचाकीची जाळपोळ झाली. हा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा महाकाली चौक परिसरात दांडिया खेळत असताना शनिवारी रात्री काही युवकांमध्ये वाद झाला. यामध्ये सदर युवकाचा बदला घेण्यासाठी झालेल्या वादावरून १२ जणांचे टोळके एकत्रित आले. आपल्याला मारहाण करणार हे समजल्यानंतर सदर युवक स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळू लागला. यावेळी महाकाली चौकापासून ते राजरत्न नगर व लोकमान्य नगर पर्यंत चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने सदर युवकाचा पाठलाग करत हातात धारदार शस्त्रे तलवार, दांडके घेऊन १२ जणांचे टोळके शिवीगाळ करीत युवकाच्या मागे लागले. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सदर युवक एका घरात लपल्याने त्याचे प्राण वाचले. घाबरलेला युवक ज्या घरात लपला त्या व्यक्तीने गुंडांना निघून जा सांगितल्यानंतर गुंड या ठिकाणाहून निघून गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा वावर, महिलांची छेडछाड, हाणामारी, घरफोडी, सोनसाखळी चोरी, खून यासारख्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलीस यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सातत्याने घडणार्‍या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असूनही त्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी सांगावे तरी कुणाला? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रकारात वाढ होत असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -