घरक्राइमकिरकोळ बाचाबाचीचा वाद गेला टोकाला; केला एकच वार आणि गेला जीव

किरकोळ बाचाबाचीचा वाद गेला टोकाला; केला एकच वार आणि गेला जीव

Subscribe

नाशिक : किरकोळ बाचाबाचीमध्ये साक्षीदाराची बाजू घेतल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका मित्रावर धारदार शस्त्राने छातीवर एक व हातावर दोन वार करत निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२६) रात्री कार्बननाका, सातपूरमध्ये घडली. विशेष म्हणजे, खूनाच्या घटनेनंतर संशयित दोन हल्लेखोरांनी अपघाताचा बनाव करत रक्तबंबाळ अवस्थेत तरुणास दोन खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा हा बनाव जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील दोन पोलिसांमुळे उघडकीस आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे.
विश्वनाथ ऊर्फ बबलू भीमराव सोनवणे (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी, सातपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. समशेर रफीक शेख (वय ४०, रा. कार्बननाका, सातपूर, ), दीपक अशोक सोनवणे (रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत विश्वनाथ सोनवणे हा चालक असून, बदली चालक म्हणून काम करायचा. तर समशेर शेख हा चिकन विक्रेता असून, त्याचे सातपूरमध्ये चिकन शॉपी आहे. विश्वनाथ चव्हाण हा शनिवारी (दि.२६) रात्री कार्बननाका परिसरात आला होता. त्यावेळी संशयित समशेर शेख व दीपक सोनवणे त्याच्याजवळ आले. किरकोळ बाचाबाचीमध्ये साक्षीदाराची बाजू घेतल्याच्या कारणावरून दोघांनी विश्वनाथ सोनवणे यास मारहाण केली. राग अनावर झाल्याने संशयित समशेर शेख याने धारदार शस्त्राने विश्वनाथ सोनवणे याच्या छातीवर वर्मी घाव करून हात दोन वार केले.

- Advertisement -

त्यात विश्वनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारार्थ दोघांनी दुचाकीवरून सुरुवातीला सातपूरमधील दोन खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून दोघांनी सोनवणे यास शनिवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत सोनवणे यास मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.

किरकोळ वादातून संशयित आरोपींनी विश्वनाथ सोनवणे याचा खून केल्याचे समोर आले. मृत तरुण व दोन हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. एका आरोपीवर अपघातासह दोन गुन्हे असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील दोन पोलिसांमुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला आहे. लवकर त्या दोन पोलिसांचा सत्कार केला जाईल. : किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

हद्दीच्या वादामुळे विलंब

विश्वनाथ सोनवणे याचा कार्बननाका परिसरात खून झाल्याचे जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांना समजले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ ओळखत सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानुसार सातपूर पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना खून झाला ते ठिकाण गंगापूर हद्दीत असल्याचे समजले. त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधत खून झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे कारवाईला विलंब झाल्याचे समोर आले. सुदैवाने अपघाताचा बनाव केलेले आरोपी जिल्हा रुग्णालयात आले आणि त्यांना चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्यथा, आरोपीसुद्धा फरार झाले असते. हद्दीच्या वादात न पडता पोलिसांनी कारवाईचा विलंब करू नये, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

- Advertisement -

तर वाचला असता जीव

गोल्डन अवर्समध्ये जखमी तरुणास दोन खासगी रुग्णालयात किंवा थेट जिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार केले असते तर त्याचा जीव वाचला असता. दोन रुग्णालयानंतर तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करताना विलंब झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -