घरमहाराष्ट्रनाशिक..अन् मृतदेहाची झाली हालचाल

..अन् मृतदेहाची झाली हालचाल

Subscribe

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच देहात संचारले प्राण, तासाभरानंतर डॉक्टरांनी पुन्हा मृत घोषीत केले

नाशिकरोड येथील एका खासगी रुग्णालयात १० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला बुधवारी (दि.३) सकाळी डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर घरी प्रचंड रडारड.. नातेवाईकांची गर्दी.. अंतिम संस्काराची तयारीही सुरू झाली. अन, मृतदेहात अचानक प्राण संचारल्याने सर्वांनाच धक्काच बसला. डॉक्टरांना पाचारण केले. उपचार केले. मात्र, तासभरानंतर पुन्हा निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नाशिकरोड परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

येथील आर्टिलरी सेंटर रोड परिसरात राहणार्‍या मध्यमवयीन महिलेला उपचारासाठी मुक्तीधाम (नाशिकरोड ) परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तब्येत गंभीर असल्याने जीव रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले, उपचार सुरू असताना मेंदुत रक्तस्राव झाल्याने कोमात गेलेल्या महिला रुग्णाला खासगी रुग्णालयातील डॉक्टरने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत घोषित केले. मृत्यूनंतरचे सर्वच सोपस्कार पूर्ण करण्यात दुपार झाली, तोपर्यंत दारावर येणार्‍यांची रांग लागली, गर्दी जमली, रडारड सुरू झाली, अंतिम तयारी झाली आणि मग मृतदेह घरी नेल्यानंतर नातेवाईकांची गर्दीत समोर ठेवला, मुले, आप्त-स्वकियांना दुःख अनावर झाले, आणि जवळ बसलेल्या काही महिलांच्या लक्षात आले की, मृतदेहात प्राण संचारला हात पाय हालायला लागले तेव्हा एकच धावपळ उडाली, काहींच्या मनात भितीचा गोळा उठला, तर काहींनी डॉक्टरांना पाचारण केले, डॉक्टर आले तपासले. नाडी पाहिली, सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी एक तास उपचार केले. मात्र, त्यानंतर महिलेचे पुन्हा निधन झाले.

- Advertisement -

मात्र, या प्रकाराने नागरिकांनी डॉक्टरांच्या कामकाजावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाच प्रकारे एखाद्याचा अंत्यविधी वेळेत केला असता तर डॉक्टरांच्या चुकीमुळे जिवंत माणसाला जाळण्याचा गुन्हा दाखल करावा लागला असता. मृत व्यक्ती एका वित्त संस्थेची संचालक व कुटुंबात राजकीय पद असल्याने निधनाची बातमी वार्‍यासारखी पसरली होती. घरासमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -