घरगणेशोत्सव 2023नाशिक ढोलचा डंका : हरिव्दारमध्ये नाशिकचे ‘शिवतांडव’; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नाशिक ढोलचा डंका : हरिव्दारमध्ये नाशिकचे ‘शिवतांडव’; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Subscribe

नाशिक : हरिद्वारमध्ये २०२० मध्ये नाशिकमधून एक ढोलपथक वादनासाठी आल्याचे तेथील माध्यमांना समजले. दुसर्‍या दिवशी तशा बातम्याही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. या बातम्या वाचून हजारो नागरिक ढोलवादन अनुभवण्यासाठी १०० किलोमीटर अंतरावरुन हरिव्दारमध्ये दाखल झाले आणि तालबद्ध व लयबद्ध वादन पाहून उपस्थित नागरिक अक्षरशः भारावले होते. अनेकांनी वादकांच्या गळ्यात हार घालून औक्षण केले.

अनेकांनी वेलची, लवंग, खडीसाखर देत कौतूक केले. हरिव्दारमध्ये तर शाही मार्गावर १४ किलोमीटर वादन केले तेव्हा वादकांवर टक्क हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. एका महंतांनी वादन पाहून वादकांना पैसे देण्याचा प्रयत्न केला, मात्र वादकांनी नकार दिला. नाशिकचे वादक पैशांपाठी नव्हे तर केवळ हौसेसाठी वादन करत असल्याचे समजताच महंतांना अप्रूप वाटले. त्यांनी वादकांना खीर-पुरीचे जेवण दिले, हे सारे क्षण वादकांसाठी अविस्मरणीय होते, अशी माहिती शिवतांडव प्रतिष्ठानचे पथकप्रमुख मिलिंद उगले यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisement -

उगले पुढे म्हणाले की, तरुणाईमध्ये ढोलवादनाची आजही प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला वादनाची संधी मिळाली पाहिजे, या हेतूने शिवतांडव प्रतिष्ठान, नाशिक या नावाने २०१५ मध्ये सहा जणांनी पथकाची स्थापना केली. २०१६ पासून ढोलवादन सुरू केले. सुरुवातीला अवघे १३ ढोल व ३ ताशे होते. तर, पथकात अवघ्या दोन मुली होत्या. त्यानंतर पथकातील महिलांची संख्या वाढत गेली. आता पथकात पुरुषांपेक्षा महिला वादक अधिक आहेत. सुरुवातीला पथकात महिलांचा सहभाग असला पाहिजे, यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. तरुणी व विवाहित महिलांनी वादन करायचे का, त्यांना वादन करता येईल का, असे अनेक प्रश्न पालक विचारायचे.

महिलांसह पालकांचे गैरसमज दूर करण्यात आम्हाला यश आले. शिवाय, पालकांचा विश्वास दृढ झाला आणि आता ते मुलींना उत्स्फूर्तपणे वादनासाठी पाठवतात. पथकात वादकांची संख्या वाढीसाठी सोशल मीडियाचाही उपयोग झाला. पथकात १५ ते ५० वयोगटातील पुरुष व महिला वादक आहेत. आवाजामुळे १८ वर्षांखालील मुलामुलींना त्रास होऊ नये, याचा विचार आम्ही केला. त्यांचा शारीरिक विकास झालेला नसतो आणि जनरेशन गॅपही असतो, या कारणामुळे शिवतांडव प्रतिष्ठानमध्ये १८ वर्षांखाली मुलामुलींना प्रवेश नाकारला जातो.

- Advertisement -

पथकात डॉक्टर, इंजिनीअर्स, व्यावसायिकही वादन करतात. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधी बडदेनगरमध्ये वादनाचा सराव केला जातो. सर्व वादकांना सरावासाठी दरारोज सायंकाळी ६ वाजता वेळेत यावे लागते. त्यामुळे वादकांना स्वयंशिस्त लागली आहे. सोनेरी रंगाचा शर्ट, सफेद पायजमा असा पथकाचा पोषाख आहे. पथकाने हैद्राबाद, विजयवाडा, हरिव्दारसह नाशिक जिल्ह्यात संगमनेर, घोटी, त्र्यंबकेश्वर, सटाणा येथे वादन केले आहे. यंदा मिरवणुकीत रोकडोबा तालीम संघांतर्फे शिवतांडव प्रतिष्ठान वादन करणार आहे.

असे आहे वेगळेपण

  • शिवतांडव प्रतिष्ठानचे सर्व ढोल चामड्याचे आहेत
  • वादन सरावात काय केले जाते याची माहिती ब्लॉगवर देण्यात आली आहे
  • निवडक ठिकाणीच वादन केले जाते
  • दरवर्षी शिवजयंती, रामनवमी आणि गणेशोत्सवात वादन केले जाते
  • पथकाचे स्वत:चे तांडव व कल्लोळ हे दोन ताल आहेत

शिवराय, बाप्पांमुळे मिळते वादनासाठीची ऊर्जा

गणेश विसर्जन मिरवणूक वाकडी बारवपासून निघाल्यानंतर उदंड उत्साहामुळे कधी पंचवटी कारंजावर येते ते कळतही नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि गणरायाचा आशीर्वाद, नाशिककर भाविकांचा सहभाग, नागरिकांकडून केला जाणारा टाळ्यांचा कडकडाट यामुळे सर्व वादकांमध्ये मिरवणुकीच्या दिवशी सकाळपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत ऊर्जा टिकून राहते, हा आजवरचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, मिरवणुकीवेळी अवघड असणारे तालसुद्धा वादक न चुकता सादर करतात. त्यास उपस्थितांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे वादकांच्या चेहर्‍यांवरचा आनंद अवर्णनिय असतो, असे शिवतांडव प्रतिष्ठानचे उगले यांनी सांगितले.

डीजेबंदीमुळे ढोलपथकांसाठी सुवर्णकाळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेमुळे महिला आणि त्यांच्या कुटुंबियांचे सहभागी होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, डीजे बंद झाल्याने आणि ढोलपथकाचे वादन शिस्तबद्ध, तालबद्ध आणि लयबद्ध असल्याने मिरवणूक पाहण्यास महिला सहकुटुंब मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी पथकांकडून नावीन्यपूर्ण वादन केले जाते. म्हणूनच ढोलपथकांना नाशिककरांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. नाशिककरांच्या सहभागामुळे वादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या गणेशोत्सवात देखील या ढोलपथकाचा दणका कायम आहे. सण-उत्सवांच्या कालावधीत ढोलपथकांना आपली कला सादरीकरणाची संधी मिळते.

प्रत्येक घरात ढोलवादक असला पाहिजे

मराठी संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येक घरात ढोलवादक असला पाहिजे. ढोलवादनामुळे धर्म, संस्कृती व सामाजिक भान समजते. शिवजयंतीसह प्रत्येक सण व उत्सवात ढोलवादन झाले पाहिजे. मनःशांतीसाठीदेखील ढोलवादन उपयुक्त ठरते. वादनामुळे अनेक वादकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला आहे, असे मिलिंद उगले यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -