घरमहाराष्ट्रनाशिकदिंडोरी : भूमीअभिलेख कर्मचार्‍यांचा जाच, त्रस्त सरपंच करणार आंदोलन

दिंडोरी : भूमीअभिलेख कर्मचार्‍यांचा जाच, त्रस्त सरपंच करणार आंदोलन

Subscribe

दिंडोरी : येथील भूमीअभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांवर कोणाचाही वचक राहिलेला नसून या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. कामात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बोपेगावचे सरपंच वसंतराव कावळे यांनी दिला आहे.

भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीची मोजणी तसेच सिटी सर्व्हे उतारे, गट एकत्रीकरण उतारे यासहित शेतजमिनिशी संबंधित अनेक कामे चालतात. खेड्या-पाड्यातील ग्रामस्थ येथे येतात. मात्र, या कार्यालयातील कर्मचारी उपस्थित नसतात. प्रत्येक कर्मचार्‍यासाठी स्वतंत्र दालन असून दालनासमोर कर्मचार्‍यांचे नाव व हुद्दा याची माहिती देणारा फलक लावलेला आहे. या खुर्च्या व दालन अनेकवेळा कर्मचार्‍यांविना रिकामे असतात.

- Advertisement -

शेतजमीन मोजणीसाठी नागरिकांकडून जास्त फी भरून घेतली जात असल्याचा आरोप सरपंच कावळे यांनी केला. चेन्नई-सूरत महामार्गाचे भूसंपादन सुरू असल्याचे कारण सांगून मोजणीकामी प्रकरणे जमा करून घेण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ केली जात आहे. यासंदर्भात अनेकवेळा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करून देखील कर्मचारी आपल्या वर्तणुकीत बदल करण्यास तयार नसल्याने तालुक्यातील सामान्य जनता व लोकप्रतिनिधी त्रस्त झाले आहेत. या कर्मचार्‍यांच्या कामात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाचा इशारा सरपंच वसंत कावळे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -