घरमहाराष्ट्रनाशिकचर्वितचर्वण : दादा-दिदींच्या रुसवा फुगव्याचे

चर्वितचर्वण : दादा-दिदींच्या रुसवा फुगव्याचे

Subscribe

नात्यातील अतुट बंधाच्या कहाण्या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वत्र ऐकायला मिळाल्या. महापालिकेत मात्र बहिण-भावातील दुराव्याचे किस्सेच कानी पडत होते.

नात्यातील अतुट बंधाच्या कहाण्या रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वत्र ऐकायला मिळाल्या. महापालिकेत मात्र बहिण-भावातील दुराव्याचे किस्सेच कानी पडत होते. यातील दिदीने दादाकडे ऐन मोक्याच्या क्षणी पाठ फिरवली होती. त्यामुळे कमालीचे नाराज झालेल्या दादाने रक्षाबंधनाच्या दिवशी तिचे फोन कॉल्सही स्वीकारले नाहीत. त्यामुळे महापालिका वर्तुळात रक्षाबंधनाच्या दुसर्‍या दिवशी बहिण-भावाच्या या अनोख्या रुसव्या-फुगव्यांची जोरदार चर्चा सुरू होती.

स्वार्था भोवतीच कारभार हाकणार्‍यांची नाती केवळ अर्थापुरतीच मर्यादित राहतात, याचा अनुभव महापालिकेचे कामकाज बघणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नगरसेवकांना चांगलाच आहे. महापालिकेचा कारभार हाकणार्‍या एका ‘दिदी’ने कारभार हाती आल्यापासूनच अण्णांना भाऊ मानले होते. या दोघा बहिण-भावांमधील ‘माये’ची चर्चा प्रत्येक महत्वपूर्ण ठरावाप्रसंगी झडत असत. प्रत्येकवेळी हा दादा आपल्या दिदीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत. त्यामुळे ठराव आडवण्याची कुणाची टाप होत नव्हती. या ‘माये’च्या नात्यात विघ्न आनणण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. पण त्यात कुणीही यशस्वी झाले नाही. मध्यंतराच्या काळात मंदिरांच्या मुद्यांवरून दादाने सभागृह डोक्यावर घेतले. इतकेच नाही तर सभा संपल्यानंतर त्यांनी सभागृहातच ठाण मांडले. यामुळे नाराज झालेल्या दिदीने दादाशी अबोला धरला. त्यावेळी त्यांचे फोन कॉल्स स्वीकारले नाही. इतकेच नाही तर दादांवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाला हाताशी धरुन चक्रही फिरवली. तरीही तिचा राग गेला नाही. दादाला पदच्युत करूनच त्या शांत झाल्या.

- Advertisement -

त्या दिवसांपासून ‘शोले की दोस्ती’ मध्ये दरार निर्माण झाली. दिदीला नवीन दादा मिळाले, पण जुन्या दादाच्या ‘मायेला’ मात्र ती पोरकी झाली. ही पोकळी आता कधीही भरुन निघणार नाही हे तिला चांगलेच ठाऊक आहे. पण आता कारकीर्दीचे दिवस तरी किती शिल्लक, या विचाराने तीही तोंडावर बोट ठेऊन होती. पण नशिबाने तीन महिन्यांसाठी कारकिर्द वाढून मिळाली. त्यामुळे ‘बॅकलॉग’ भरून काढण्याची दिदीसमोर नामी संधी आहे. पण दादाशिवाय हे साध्य होणारच नाही असा विश्वास तिला आहे. त्यामुळे दादाशी पुन्हा एकदा गट्टी करण्याच्या तयारीत ती आहे. त्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त गवसण्यात आला. राखी बांधण्यासाठी तिने दादाला निमंत्रण दिले, पण दादाने त्याकडे दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर दिदीने त्यानंतर केलेले कॉल दादाने स्वीकारलेच नाही. महापालिका निवडणुकीत दगाफटका करणार्‍या दुसर्‍या एका दिदीचेही कॉल त्यांनी स्वीकारले नसल्याचे ऐकीवात आहे. दादा- दिदींमधील या रुसव्या फुगव्यांची चर्चा आता विधानसभा निवडणुकीपर्यंत अशीच चालू राहणार हे निश्चित!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -