घरमहाराष्ट्रनाशिकसिन्नरचे पाणी मराठवाड्यास जाऊ देणार नाही : गोडसे

सिन्नरचे पाणी मराठवाड्यास जाऊ देणार नाही : गोडसे

Subscribe

जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन नवीन योजना राबवण्याची मागणी

सिन्नर तालुक्यातील गारगाई वैतरणा कडवा देव या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हे पाणी मराठवाडयाला वळवल्यास सिन्नर तालुक्यावर मोठा अन्याय होणार असून यामुळे लोकभावना भडकून जनक्षोभ तयार होईल. त्यामुळे शासनाने कोकण खोर्‍यावर नवीन स्वतंत्र नदीजोड प्रकल्प तयार करावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व औद्योगिकरणासाठी दमणगंगा- एकदरे-गंगापूर नदीजोड प्रकल्प मार्गी लावला. या प्रकल्पातून पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच सिन्नर या कायम दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणारी गारगाई- वेैतरणा- कडवा- देव नदीजोड योजना प्रस्तावित केली. या योजनेतून ७ टीएमसी पाणी उपलब्ध होईल. याच प्रकल्पातून निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याला गोदावरी खोर्‍यातून २५ टीएमसी पाणी देण्यासाठी दमणगंगा, नार-पार या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळवण्यास राज्य मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली; या निर्णयामुळे नाशिककरांवर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे, यासंदर्भात खासदार गोडसे यांनी जलसंपदामंत्र्यांशी चर्चा केली.

- Advertisement -

सिन्नर तालुका हा पाचशे मीटर उंचावर आहे. या तालुक्यातील पर्जन्यमान सरासरी अडीचशे मिलीमीटर आहे. त्यामुळे हा तालुका सतत दुष्काळी म्हणून संबोधला जातो. त्यामुळे हा प्रकल्प सिन्नरसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, राज्य शासनाने या प्रकल्पांतील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतल्याने नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पातून मराठवाडयाला पाणी न देता कोकणातून नवीन प्रकल्प प्रस्तावित करून मराठवाडयाला पाणी द्यावे, असा पर्यायही यावेळी मांडण्यात आला. मात्र कुठल्याही परिस्थितीत सिन्नरकरांचे पाणी मराठवाड्याला जाऊ देणार नाही अशी भूमिका खासदार गोडसे यांनी मांडली.

अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे शक्य

पश्चिम वाहिनी नदी खोर्‍यातील उल्हास, वैतरणा, नार पार व दमणगंगा खोर्‍यांत ३६५ अब्ज घनफूट पाणी उपलब्ध आहे. हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोर्‍यात वळवणे शक्य आहे. त्यासाठी कोकणात नवीन स्वतंत्र नदीजोड प्रकल्प प्रस्तावित करून मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करावे, असा पर्याय यावेळी देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत सिन्नरकरांसाठी प्रस्तावित केलेल्या नदीजोड प्रकल्पातून पाणी मराठवाडयाकडे जाऊ देणार नाही. – खासदार हेमंत गोडसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -