घरक्राइमजिल्हा बँक गटसचिव अपहार : दिंडोरीचे विभागीय अधिकारी भोईचा जबाब; धक्कादायक खुलासे,...

जिल्हा बँक गटसचिव अपहार : दिंडोरीचे विभागीय अधिकारी भोईचा जबाब; धक्कादायक खुलासे, गूढ वाढले

Subscribe

पैसे काढण्यासाठी शैलेश पिंगळे, वाय. के. पाटील यांनीच दबाव आणल्याचा आरोप

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गटसचिवांच्या प्रोत्साहन निधी अपहार प्रकरणातील अत्यंत महत्वाचे साक्षीदार व कथित ऑडिओ क्लिपमधील दिंडोरीचे विभागीय अधिकारी परशराम भोये यांनी आपला महत्वपूर्ण जबाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केला. यात भोई यांनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने याप्रकरणातील गूढ वाढले आहे. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे व तात्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे वादग्रस्त सचिव वाय. के. पाटील यांनीच दबाव आणून दिंडोरी शाखेतील 27 लाख रुपये काढल्याचे भोई यांनी म्हटले आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत गट सचिवांच्या प्रोत्साहन निधीच्या नावाखाली लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतिश खरे याच्या वरदहस्ताने कोट्यवधींचा अपहार झाला. याप्रकरणात सखोल चौकशी होऊन अपहार झाल्याचे स्पष्ट असतानाही विभागीय सहनिबंधक विलास गावडे यांच्याकडून कारवाईत चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे. तात्कालीन जिल्हा उपनिबंधक सतिश खरे याला 30 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर जिल्हा बँकेतील गटसचिवांच्या अपहाराला वाचा फुटली. गटसचिवांच्या प्रोत्साहन निधीचा केलेला अपहार अत्यंत गंभीर असून यात बँकेचे संचालक व अधिकारी गुंतल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सहकार विभागाकडून केवळ चौकशीचे सोपस्कार पार पाडले जात असून, सहकार अधिकारीदेखील संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

- Advertisement -

अपहारप्रकरणी महत्वाची ऑडिओ क्लीप प्रसिद्ध झाल्यानंतर यातील बँकेच्या दिंडोरी शाखेचे विभागीय अधिकारी परशराम भोये यांच्या यासंदर्भातील संभाषणातून अपहारात सहभागी अधिकारी व संचालकांचा बुरखा फाटला आहे. दरम्यान, 8 जून रोजी भोये यांनी या प्रकरणातील महत्वाचा लेखी जबाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला आहे. 24 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री गटसचिव विलास पेखळे आणि देविदास नाठे आले असता त्यांना दिंडोरी शाखेतून एकाच वेळी 27 लाख 78 हजार 60 रुपये काढून दिले. हे पैसे देण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, तात्कालीन अध्यक्ष केदा आहेर यांचे वादग्रस्त स्वीय सहायक वाय. के. पाटील व दिंडोरीचे संचालक गणपत पाटील यांनी दबाव टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. यांच्या दबावाला घाबरुन पैसे काढून दिल्याचे भोई यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आक्षेप घेतला असता राग आल्याने आपल्याला निवृत्तीच्या अदल्या दिवशी बडतर्फ केल्याचे भोई यांनी म्हटले आहे. दरम्यान, भोई यांनी याप्रकरणी लेखी जबाब दाखल केल्यामुळे या प्रकाराला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निलंबन का नाही ?

याप्रकरणी माय महानगरने विभागीय अधिकारी भोई यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्यानंतर सीईओ शैलेश पिंगळे व वादग्रस्त स्विय सहायकांना सक्तीच्या रजेवर पाठविले. वास्तविक शैलेश पिंगळे व वाय. के. पाटील हे गट सचिवांच्या अपहारप्रकरणात दोषी असल्याचे स्पष्ट असताना त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई का होत नाही असा सवाल सभासद विचारताहेत.

- Advertisement -

‘त्या’ भेटीच रहस्य काय ?

विभागीय सहनिबंधक गावडे गेल्या आठवड्यात गटसचिव संघटनेचे तात्कालीन अध्यक्ष दीपक पवार यांना भेटले. गटसचिवांच्या अपहार प्रकरणात दीपक पवार यांची भूमिका महत्वाची असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पवार गावडे भेटीत काही शिजत आहे का, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. दरम्यान, दीपक पवार व वादग्रस्त स्विय सहायक वाय. के. पाटील यांच्यातील संभाषण तपासण्याची मागणी होत असून, यातून महत्वाची माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहकार विभागाची भूमिका संशयास्पद 

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गटसचिवांच्या अपहाराचा प्रकार गंभीर असून, याची सहकार कायद्याने चौकशीही केली आहे. त्यात अपहार झाल्याचे स्पष्ट असूनही संबंधीतांविरुद्ध सहकार खात्याने कुठलीही कारवाई केली नसल्याने सहकार विभाग संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

पुरावे नष्ट होण्याची भीती 

शैलेश पिंगळे आणि वाय. के. पाटील यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर कारवाईच्या भितीने त्यांनी लॉकरमधील घबाड काढून नेले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने कारवाई न केल्यास या प्रकरणातील पुरावे नष्ट केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गटसचिवांचे अनुदान द्यायचे आहे, असा निरोप विभागीय अधिकारी परशराम भोई यांना दिला. त्यानंतर भोई यांनीच पैसे जमा केले. त्याचे वाटपही त्यांनीच केले. ते पैसे कोठे ठेवले याबाबत मला काहीही माहीत नाही. भोई यांना अधिकार्‍यांचे फोन आले तर त्यांनी त्याबाबत लेखी पत्र का घेतले नाही. भोई यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत, या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. : गणपत पाटील, तात्कालीन संचालक, दिंडोरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -