घरक्राइमजागतिक बालकामगार विरोधी दिन विशेष : "मजुरीच्या ओझ्याखाली दबलेले बालपण"

जागतिक बालकामगार विरोधी दिन विशेष : “मजुरीच्या ओझ्याखाली दबलेले बालपण”

Subscribe

अहमदनगरमध्ये मेंढीपालनासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर नाशिकसह नगर जिल्ह्यात बालकामगार व वेठबिगारी निर्मूलन मोहीम तीव्र करण्यात आली. बालमजुरी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांची विशेष पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तरीही, नाशिक शहर व जिल्ह्यात आजही बालकामगार आढळून येत आहेत. बालमजुरी रोखण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी ते प्रभावी ठरत नसल्याचे वास्तव आहे. सामाजिक मानसिकता बदलत नसल्याने उमलत्या वयातच मुलामुलींचे शोषण केले जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. नाशिकमध्ये आजही अनेक हॉटेल्स, चहाच्या टपर्‍या, सिग्नलवर लहान-मोठ्या वस्तू विक्री करणार्‍या मुला-मुलींचे प्रमाण मोठे आहे.

बालमजुरी हिरावतेय बालपण अन् शिक्षण

नाशिक : चहाची टपरी, हॉटेल, छोटे-मोठे कारखाने, किराणा, टप्पल व कपडे यांसारख्या वस्तूंची दुकाने अशा ठिकाणी आजही बालकामगार हमखास सापडतात. बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांना काम करण्यास भाग पाडणे यातून मुलांचे बालपण हिरावले जातेच शिवाय ही मुले शिक्षणापासूनही वंचित राहतात. गरीबीमुळे शाळा न शिकणारी मुले, मुली कामधंदा करुन अर्थार्जन करतात. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग, व्यवसायात कामावर न ठेवता त्यांची शारिरीक व मानसिक वाढ होण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथा निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.

- Advertisement -

बालकामगार निर्माण होण्यास आईवडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे व पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालवण्यासाठी अर्थार्जन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन इ. पारंपरिक व्यवसाय करतात. गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा-भंगार वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुले कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सामान्यत: बालकामगार मुली या नाईलाजास्तव काम करतात. शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. जो पैसा हाती पडतो तो घरखर्चावर तसेच व्यसनांवर खर्च होतो. अनेक मुले कचर्‍याच्या ढिगार्‍यातून निरनिराळ्या वस्तू पुनप्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. रोजगाराच्या समस्येमुळे सेवाक्षेत्रासह कारखानदारीतही बालकामगार आढळतात.

कारखान्याचे मालक व पालकांची बेपर्वाई यामुळे अजूनही विडी उद्योग व वस्त्रोद्योगामध्ये बालकामगार काम करत आहेत. हॉटेल, बूटपॉलिश, गाडया पुसणे इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले आजही आढळतात. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात ढकलले जाते. गरीबी, निरक्षरता, अंधश्रध्दा इत्यादी कारणे आहेत. पण यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजुरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

- Advertisement -

बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगार विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे. त्यांना शासनाकडून शैक्षणिक व व्यवसाय प्रशिक्षण साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्न भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेची विशेष गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलेने शिकवितात.

  • बालमजुरीचे प्रकार

गुलामगिरी, मुलांची तस्करी, कर्जाचे बंधन, जबरदस्तीने मजुरी, सशस्त्र संघर्षातील मुले आणि बेकायदेशीर कामात काम करणारी मुले हे बालमजुरीचे प्रकार मानले जातात.

  • ही आहेत बालमजुरीची मुख्य कारणे

बालमजुरी आणि शोषण हे अनेक घटकांचे परिणाम आहेत. ज्यात गरिबी, सामाजिक नियम त्यांना माफ करतात. प्रौढ आणि किशोरवयीन मुलांसाठी योग्य कामाच्या संधींचा अभाव, स्थलांतर आणि आपत्कालीन परिस्थिती यांचा समावेश होतो . हे घटक केवळ कारणच नाहीत तर भेदभावामुळे प्रबळ झालेल्या सामाजिक असमानतेचा परिणामदेखील आहेत.

  • ४२.७ दशलक्षाहून अधिक मुले शाळाबाह्य

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील ५ ते १४ वयोगटातील बालकांची संख्या तब्बल २५९.६ दशलक्ष आहे. यापैकी १०.१ दशलक्ष (एकूण बालकांच्या लोकसंख्येच्या 3.९%) एकतर ’मुख्य कामगार’ किंवा ’किमान कामगार’ म्हणून काम करत आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील ४२.७ दशलक्षाहून अधिक मुले शाळाबाह्य आहेत. २०११ मध्ये एवढी मोठा आकडेवारी असेल तर २०२३ मध्ये ही संख्या मोठई असण्याची शक्यता आहे. कारण, दिवसेंदिवस इमारती आणि हॉटेल्सच्या संख्येत वाढ होत आहे.

  • बालकामगार ठेवल्यास गुन्हा

कुटुंबातील लहान मुलामुलींना घरातील, शेतातील, वीटभट्टीवर माती कालवणे, कारखान्यांवर मोळी वाहने, पाणी भरणे, स्वयंपाक करणे अशी कामे लावणे आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हा बाल कामगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा आहे. १४ वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून घरातील आणि शेतातील कठीण कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे.

  • नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास

बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६, वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, हे या अधिनियमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे . विशेषतः, १४ वर्षाखालील कोणत्याही मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये व हानीकारक प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास प्रतिबंध करतो. त्याचप्रमाणे तो, मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास हानिकारक मानले गेलेले १६ व्यवसाय व धोकादायक समजल्या गेलेल्या ६५ प्रक्रियांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करतो. ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या किंवा तुरुंगवासाच्या शिक्षा देण्याच्या तरतुदीही त्यामध्ये आहेत. मात्र, या अधिनियमाच्या कक्षेमधून कुटुंबे व प्रशिक्षण संस्थांना वगळण्यात आलेले आहे. नियमभंग करणार्‍यांना ३ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंत तुरुंगवास, व त्यासोबत १० ते २० हजार रुपये दंड होऊ शकतो. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय बालकामगार योजना राबवण्यात आलेली आहे.

  • या राज्यात सर्वाधिक बालमजूर

बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही भारतातील मुख्य राज्ये आहेत जिथे बालकामगार आहेत. देशातील एकूण बालकामगार लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या याच ठिकाणी काम करते.

जिल्ह्यात बालमजुरी रोखण्यासाठी अ‍ॅण्टी ह्युमन ट्रॅफिक सेलमार्फत विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामार्फत तालुकानिहाय हॉटेल्स, चहाची टपरीसह वीटभट्टीसह विविध ठिकाणी भेटी देत जनजागृती केली जात आहे. ज्या ठिकाणी बालकामगार आढळून येतात त्या ठिकाणी कारवाई केली जाते आहे. : शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

– ठळक घडामोडी 

: जिल्हाधिकार्‍यांनाच वॉरंट

आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलांची काही हजार रुपयांत विक्री करून मेंढीपालनाच्या वेठबिगारी प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहणे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भोवले होते. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये समन्स बजावून नाशिक व नगरचे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक साक्षीदार म्हणून हजर राहिले नाहीत. त्यामुळे या चारही अधिकार्‍यांच्या नावाने आयोगाने अटक ‘वॉरंट’ जारी केले होते.

: मेंढीपालनासाठी मुलांची विक्री, एका मुलीचा खून

इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाला पैसे व मेंढीपालनाचे आमीष दाखवून त्यांच्या मुलांची विक्री झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती. त्यापैकीच एका मुलीचा खून झाल्यानंतर हे प्रकरण प्रकाशझोतात आले. यानंतर वेठबिगारीसह मुलांच्या विक्रीच्या प्रकरणांचा भांडाफोड झाला. काही पीडित मुला-मुलींनी दिलेल्या जबाबानुसार, संगमनेर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यातील एक गुन्हा पारनेर पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. त्या अन्वये नाशिक व नगरमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणांत संशयितांना अटक झाली असून, पोलीस तपास सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांनीही पीडितांच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी कार्यवाही केल्याची माहिती आहे.

: दोन अल्पवयीन मुलांची मुक्तता

बालकामगार व वेठबिगारी निर्मूलन व जनजागृती मोहीम अधिक व्यापक करून ती अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी १ मे कामगार दिनी विशेष पथक कार्यरत केले आहे. हे पथक जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागांसह अतिदुर्गम भागातील वाड्या-वस्त्या व गावांना भेटी देऊन स्थानिक पोलीस पाटील, आदिवासी समाजातील नागरिक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांची मदत घेणार आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन बालकामगार व वेठबिगारी निर्मूलनाविषयी प्रबोधन करणार आहेत. त्याचप्रमाणे, वेठबिगारीसंदर्भातील काही अप्रिय घटना घडणार नाहीत, याबाबत जनजागृती करणार आहे. मोहीमेदरम्यान जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने बालरोजगारीच्या विळख्यातून दोन अल्पवयीन मुलांची मुक्तता केली आहे. वाड्यावर शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी ठेवून अल्पवयीन मुलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण करून बालकामगारास कमी वेतन देऊन त्यांच्याकडून श्रमाचे काम करून घेतले जाते. सटाणा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

: ३० मुलांची विक्री

कातकरी कुटुंबातील मुले अवघ्या ५ हजार रुपयांत विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सप्टेंबर-२०२२ मध्ये उघडकीस आला. मेंढपाळांकडून मेंढ्या चारण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात आहे. इगतपुरी तालुक्यातील गौरी आगविले या मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे ही टोळी उघडकीस आली. गेल्या तीन वर्षांत जवळपास ३० मुलांची विक्री झाल्याचे वास्तव श्रमजीवी संघटनेने समोर आणले. यातील सहा मुले सापडली असून, 24 मुले अद्याप बेपत्ता आहेत. या प्रकरणांमध्ये घोटी, अकोले, घुलेवाडी या तीन पोलीस ठाण्यांमध्ये वेठबिगारी, बालमजुरी आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील मुख्य आरोपींची नावे कांतीलाल करांडे व विकास कुदनर अशी आहेत.

: कोण होती गौरी

अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेली गौरी ही कातकरी समाजातील होती. मिळेल तिथे झोपड्या टाकून वीटभट्टी, खडी फोडणे, मासेमारी करून हे कुटुंब आपली गुजरान करतात. उभाडे गावात राहणार्‍या गौरीला अवघ्या तीन हजार रुपयांसाठी तिच्या जन्मदात्रीनेच संगमनेरच्या विकास सीताराम कुदनर याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी सोपविले होते. गौरीची आई तुळशीबाई सुरेश आगिवले इगतपुरी तालुक्यातील वीटभट्टीवर काम करून आपली गुजरात करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -