घरक्राइमकोटंबी घाटातील वळणावर ट्रेलर उलटून चालक ठार; भीषण अपघातात ट्रेलरचाही चुराडा

कोटंबी घाटातील वळणावर ट्रेलर उलटून चालक ठार; भीषण अपघातात ट्रेलरचाही चुराडा

Subscribe

नाशिक : गुजरात राष्ट्रीय महामार्गावर पेठ तालुक्यातील कोटंबी घाटातील अपघातांची मालिका सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. सातत्याने या घाटात तसेच महामार्गावर अपघात होत आहेत. असाच एक भीषण अपघात गुरुवारी (दि. १४) गुजरातहून नाशिककडे मशिनरी घेऊन जाणाऱ्या अवजड ट्रेलरचा झाला आहे. कोटंबी घाटातील अपघातप्रवण वळणावर ट्रेलर उलटला. या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर ट्रेलरचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे.

गुजरातकडून नाशिककडे जाणारा ट्रेलर(जीजे ०५ बीएक्स २३१७) घाट उतरत असताना अपघातप्रवण वळणावरील खड्डयात कोसळला. सरळ पुढील दिशेने खड्डयात पडल्याने ट्रेलरखाली दबल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत चालकाला बाहेर काढले. या अपघातामध्ये वाहनाचा चक्काचूर झाला असून, अवजड मशिनरी फेकली गेली.कोटंबी घाटात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.

- Advertisement -

या वळणाच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावर बुधवारी तहसील कार्यालयात आंदोलक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये अवघड वळणे, रस्त्यावरील खड्डे यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. घाटामध्ये तत्काळ दुरुस्तीचे अश्वासन देऊन अल्पकाळ लोटला असताना पुन्हा अपघात झाल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील कोंटबी घाटातील कामांच्या अशास्त्रीय वळनणांमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी योग्य त्या सुविधा पुरवून कामातील दुरुस्त करावी. विशेष म्हणजे, यू आकाराचे अपघाती वळण काढण्यात यावे अशी मागणी कोंटबी येथील स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून केली जात आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या वळणावर उपाययोजना केली जात नाही. अपघातांच्या मालिका सुरूच असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -