घरमहाराष्ट्रनाशिकज्ञानाची ऊर्जा वाढवणारा शिक्षण सूर्य मावळला; प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे निधन

ज्ञानाची ऊर्जा वाढवणारा शिक्षण सूर्य मावळला; प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे निधन

Subscribe

नाशिक : येथील नाशिक शिक्षण संस्थेचे (नाएसो) अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर (वय ७३) यांचे बुधवारी (दि.१३) दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. (Nashik Education sociaty President Prof. Suryakant Rahalkar passed away on Wednesday 13 august afternoon due to a brief illness)

नाशिक शिक्षण संस्थेच्या कामात रहाळकर यांनी स्वत:ला वाहून दिले होते. १९२३ मध्ये स्थापन झालेली नाशिक शिक्षण संस्था ही शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. संस्थेच्या विविध शाळांमध्ये जवळपास २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही वर्षांपासून या संस्थेची जबाबदारी रहाळकर सांभाळत होते. अलिकडेच संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी त्यांनी नवनवीन संकल्पना मांडून पुढाकार घेतला होता. यानिमित्त आजी-माजी संस्था अध्यक्ष, कार्यवाह, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी अशा अनेकांना एकत्र आणून संस्थेशी ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रा. रहाळकर यांच्या निधनाची माहिती समजताच संस्थेच्या सर्व शाळा मधली सुटी झाल्यानंतर सोडून देण्यात आल्याचे पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

रहाळकर यांनी प्राध्यापक म्हणून बी.वाय.के. महाविद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले. त्यानंतर १९९९ पासून आजतागायत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे होती. संस्थेच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विकासासाठी अनेकविध योजना मार्गदर्शनाने राबविल्या गेल्या. आपली संस्था बहुजनांना शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली आहे, असे ते नेहमी सांगत. समाजातील गरीब लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. यासाठी ते प्रयत्नशील होते. शाळांच्या गुणात्मक विकासासाठी मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावत होते. संस्थेमध्ये कार्यरत शिक्षक, कर्मचारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते.

नाशिक शहरातील समाजकारण, राजकारण, शिक्षणक्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. अनुभव, अभ्यासू, तल्लख बुद्धी, अचूक निष्कर्ष आणि भविष्याचा नेमका वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. नोकरीनंतर विविध पदांची जबाबदारी सांभाळून पारंपरिक व्यवसायदेखील ते सांभाळत होते. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रातील विविध पदांची जबाबदारी पेलत असतानाच ही एक प्रकारची समाजसेवा असल्याचे ते नेहमीच सांगत. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले होते. प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या जाण्याने आज एक उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आणि अष्टपैलू व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बांधकाम व्यवसायात त्यांनी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले होते. धार्मिक कार्यात म्हणजेच मंदिर बांधणे, समाधी बांधणे यात ते नेहमी अग्रेसर असत. प्रा. रहाळकर हे निर्वाण इंडस्ट्री आणि रहाळकर सोडा फॅक्टरीचे संचालक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. प्रा. रहाळकर यांच्या जाण्याने या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रा. रहाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. : प्रा. देवयानी फरांदे, आमदार

प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनामुळे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. ते नेहमी मार्गदर्शन करायचे. स्काऊट गाईड चळवळीत असताना ते उपाध्यक्ष होते. त्यावेळी काम करताना ते मार्गदर्शन करत. : अ‍ॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

प्रा. रहाळकर यांच्याशी नेहमी संवाद साधता येत होता. त्यांच्या निधनामुळे शहरातील तज्ज्ञ मार्गदर्शक हरपला आहे. स्वा. सावरकरांचे संमेलन आयोजित केले होते, तेव्हा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येकाला आपलेसे करणारे असे मनमिळाऊ आणि तितकेच प्रेमळ प्रा. रहाळकर होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील मोठी व्यक्ती हरवल्यासारखे वाटत आहे. मराठी शाळांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. : अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना नाशिक

प्रा. रहाळकर आणि डॉ. वसंतराव पवार यांचे अत्यंत चांगले संबंध होते. त्यांनी स्काऊट गाईड चळवळीला व्यापक स्वरुप प्राप्त करुन दिले. मविप्रच्या कार्यकाळात स्काऊड गाईडसाठी त्यांनी तीन एकर जमीन घेतली. त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ते सर्वांना सोबत घेऊन काम करायचे. : नीलिमा पवार, माजी सरचिटणीस, मविप्र

प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाने मोठ्या व्यक्तीला, व्यासंगी प्राध्यापक व नामवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना आम्ही मुकलो आहोत. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींसाठी ते प्रेरणा होते. : प्रा. वृंदा भार्गवे

प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी पाणी बचत विषयावर मोठे काम केले. नाशिकमधील संस्थांना ते एकत्रित घेऊन त्यांचे मार्गदर्शन करायचे. त्यामुळे ते सर्व संस्थाचालकांचे एक आधारस्तंभ होते. सरकार दरबारी शैक्षणिक प्रश्न मांडायला ते नेहमी पुढे असत. त्यांच्या निधनाने शिक्षणक्षेत्राची हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. : सचिन जोशी, शिक्षणतज्ञ

प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षणमहर्षी हरपला आहे. प्रा. रहाळकर हे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे. मुख्याध्यापक संघ व संस्थाचालकांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे. कोणताही प्रश्न असला की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यातून मार्ग मिळणार, असा विश्वास असायचा. त्यामुळेच सर्व क्षेत्रांतील व्यक्तींशी त्यांची जवळीक होती. प्रा. रहाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. : नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक महासंघ नाशिक जिल्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -