Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र रुबाबदार सर्ज्या-राजाचा बिकट प्रवास; 'मंगलरूप'मध्ये होतेय सेवा

रुबाबदार सर्ज्या-राजाचा बिकट प्रवास; ‘मंगलरूप’मध्ये होतेय सेवा

Subscribe

नाशिक : बैल हा शेतकर्‍याचा खरा मित्र आहे असे आपण मानतो. शेताच्या कामांबरोबरच कधीकाळी शर्यतीचे मैदान गाजवलेल्या रुबाबदार खिल्लारी बैलजोड्यांचा उतारवयाचा वेदनादायी प्रवास नाशिक शहरातील “मंगळरूप” गोशाळेत सुरू आहे. सध्या आधुनिकतेच्या काळात बैलांची जागा ही ट्रॅक्टरने घेतली, असे म्हटले जात असले, तरी अजूनही शेतकर्‍यांच्या काही कामांना बैलांशिवाय पर्याय नाही.

सध्याच्या काळात बैल जोपर्यंत देखणा किंवा तरुण आहे तोपर्यंतच त्याचा संभाळ केला जातो. आजपासून ५० वर्षांपूर्वी शेतीच्या कामासाठी बैल हा एकमेव पर्याय होता. परंतु, तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे बैलांची जागा ट्रॅक्टर सारख्या यंत्रांनी घेतली आणि बैलांचे महत्व दिवसेंदिवस कमी कमी होते गेले. आता बैल फक्त शर्यतीत आणि घरापुढे शोभेसाठीच वापरला जातो आहे. शर्यतीत पाय निकामी झालेले बैल किंवा उतारवयाला लागलेल्या बैलांना कत्तल खाण्यात किंवा गोशाळेत दिले जाते. अश्याच ५० पेक्षा जास्त बैलांचा सांभाळ शहरातील मंगळरूप गोशाळा करत आहे.

- Advertisement -

आपलं महानगरने दिलेल्या भेटीदरम्यान तेथे विविध प्रजातींचे बैल बिकट अवस्थेत आढळून होते. गोशाळेच्या संचालक रूपाली जोशी यांच्याशी बोलत असतांना त्यांनी एका बैलकडे बोट दाखवत सांगितले की हा नाशिकमधील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पर्यटकांना आकर्षित करणारा बैल होता. वर्षानुवर्षे ग्राहकांना तसेच पर्यटकांना आकर्षित करणार्‍या ह्या बैलाला काही त्वचेशी निगडित आजार झाल्यामुळे त्याला येथे आणून सोडले. असे त्यांनी सांगितले. तसेच गावोगावी शर्यत गाजवलेल्या अनेक बैलजोड्याही येथे होत्या.

त्यापैकी एक गीर प्रजातीच्या बैलाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की हा बैल कत्तखान्यातून सुटून आम्हाला जखमी अवस्थेत भेटला. पोलिसांच्या साहाय्याने आम्ही त्याला ताब्यात घेतले. पण त्याच्या मनांत माणसांविषयी भीती निर्माण झाली होती. म्हणून त्याच्याजवळ प्रथमोपचार करायला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो ईजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत असे. पण स्वतः जखमी होऊनही गोसेवकांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. नंतर त्याला माणसाळवले आणि आता तो आमच्यासोबत आनंदाने येथे रहात आहे. आजमितीस त्यांनी ५० पेक्षा जास्त बैल आणि ६० पेक्षा अधिक गाईंना आसरा दिला असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दानशूर लोक त्यांना या कार्यात मदत करत आहे.

रस्त्यावर भटका, जखमी, बेवारस अशा बैल, गाय अश्या गोवांशीय प्राण्यांना आम्ही सांभाळतो. अपघात झालेल्या जखमी प्राण्यांना आम्ही 24 तासांत कधीही आम्हाला फोन आला की आम्ही त्या ठिकाणी जाऊन बचावकार्य करतो. एमब्युलन्स द्वारे त्यांना शेल्टरपर्यंत आणून त्यांची सुश्रुषा करतो. आमच्याकडे अनेक गोवंशीय प्राणी आहेत. अनेक शेतकरी किंवा गाडामालकही म्हातार्‍या बैलांना आमच्याकडे आणून सोडतात. पण आम्ही त्यांचा आम्ही शेवटपर्यंत योग्य सांभाळ करतो. : पुरुषोत्तम आव्हाड, अध्यक्ष, मंगलरुप गोशाळा

अपंग, भटक्या, बेवारस , म्हातार्‍या बैलांचा आम्ही सांभाळ करतो. पण हे कार्य करताना आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक, सामाजिक असे अनेक प्रसंग येतात. देणगी देणारे देयकही आता कमी झाले आहे. अनेक लोक आता मोठेपण मिरवण्यासाठी गोशाळा उघडतात. पण लोकांनी देणगी देताना आधी गोशाळा म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवे. दूधदुबत्या गायी सांभाळणे म्हणजे गोशाळा नव्हे. अनेक लोक हेदेखील सांगतात की, आमच्या समाजाच्या लोकांची गोशाळा आहे आम्ही तिकडे देणगी देतो. पण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला बैल किंवा इतर प्राण्यांना कुठलीही जात, जमात नसते. लोकांनी याबद्दल जागरूक असायला हवे. : रुपाली जोशी, संचालक, मंगलरूप गोशाळा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -