घरमहाराष्ट्रनाशिकब्रम्हगिरी सुरुंग प्रकरणाचे उत्खनन ; कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

ब्रम्हगिरी सुरुंग प्रकरणाचे उत्खनन ; कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे आदेश

Subscribe

उत्खननप्रकरणी संबधित बांधकाम व्यावसायिकाला बजावली दीड कोटी रूपयांची नोटीस

ब्रम्हगिरी डोंगराच्या पायथ्याशी सुरुंग लावून सुरू असलेल गौण खनिज उत्खननासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे. या अवैध उत्खननप्रकरणी संबधित बांधकाम व्यावसायिकाला सुमारे दीड कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. त्याचप्रमाणे तेथील तलाठी, कोतवालांना निलंबित करण्यात आले आहे असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ब्रम्हगिरीचे पर्यावरणीय संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले. या संदर्भात ‘आपलं महानगर’ने ७ जानेवारीला सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते.

पेगलवाडीपासून ते प्रदक्षिणेचा परतीचा मार्ग असलेल्या सापगाव शिवारपर्यंत हे खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळे पर्यावरणाचा समतोल ढासाळून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या संदर्भात ७ जानेवारी रोजी दैनिक आपलं महानगरचे वृत्तही प्रकाशित केले होते. याबाबत प्रशासनाने दखल घेत प्रत्यक्ष स्थळावर भेट देवून पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर मंडळ अधिकारी आणि तळेगाव येथील तलाठयांनी पाहणी केली.

- Advertisement -

त्यानुसार त्र्यंबकेश्वर तहसिलदार दीपक गिरासे संबधित विकास सावंत यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार मौजे तळेगांव येथील गट नं १२३/ब/१/अ या गटात खड्डा भरण्यासाठी रॉयल्टी भरून खोदकाम करण्यास परवानगी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र उत्खननास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. असे असतांनाही संबधितांनी सदर गटात जेसीबी, पोकलेन मशीन लावून विनापरवानगी खोदकाम सुरू केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. यात सुमारे १७५० ब्रास माती, सुमारे २५० ब्रास मुरूम, ५० ब्रास दगड उत्खनन केल्याचे दिसून आले. याबाबत परवानगीची कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. याबाबत संबधितांनी लेखी खुलासा करण्याचे या नोटीसीत नमूद करण्यात आले असून या अवैध उत्खनन प्रकरणी दीड कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तहसीलदारांना नोटीस
याप्रकरणी जमिनीचे विकासक विकास सावंत यांच्याविरूध्द शासकीय आदेशाचा भंग केला म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तलाठी विजयसिंग परदेशी आणि कोतवाल शंकर वाघेरे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार दीपक गिरासे आणि मंडल अधिकारी वाघेरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -