घरमहाराष्ट्रनाशिकनव्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरडा ठार

नव्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरडा ठार

Subscribe

नव्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू, महालपाटणे येथील दुर्दैवी घटना

नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरवरून कुटुंबीयांसह मोठ्या आनंदाने शेताकडे जात असताना गतिरोधकावर ट्रॅक्टर उधळून आठ वर्षाचा एकुलता एक मुलगा चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बागलाण तालुक्यातील लखमापूर येथे घडली.

व्हीपीएन संस्थेचे कर्मचारी विश्वनाथ खरोले यांनी सटाणा येथून शुक्रवारी (२१ जून) ट्रॅक्टर विकत घेतला. खरोले हे पत्नी व दोन्ही मुलांना ट्रॅक्टरवर बसवून मूळगावी महालपाटणे येथे जात होते. लखमापूर येथे पेढे घेण्यासाठी ट्रॅक्टर निंबोळा रस्त्याकडे उभे करण्यासाठी घेवून जात असतानाच गतिरोधकावर ट्रॅक्टर उधळला. यामुळे खरोले यांचा मुलगा आयुषचा तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून कोसळून खाली पडला. काहीही समजण्याच्या आत आयुषवर ट्रॅक्टरचे मोठे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खरोले कुटुंबीयांच्या आनंदावर क्षणार्धात विरजण पडून होत्याचे नव्हते झाले. मोठ्या उत्साहाने नवीन ट्रॅक्टरचे पेढे घेवून आलेल्या आयुषच्या आईला मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे पाहून आणि एकुलता एक मुलगा आपल्याच ट्रॅक्टरखाली पडून मृत्यू झाल्याने आई – वडील आणि आयुषच्या बहिणीने फोडलेला हंबरडा घटनास्थळी उपस्थित सर्वांनाच चटका लावून गेला.

- Advertisement -

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते शाम बागडणे, माजी नगरसेवक छोटू सोनवणे यांनी मयत आयुषचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणला. श्रीराज पाटील यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आयुषचा मृतदेह मुळगावी महालपाटणे येथे रवाना करून आयुषला अखेरचा निरोप दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -