नातवाकडून आजीची हत्या; हातातील कड्याने जीवघेणे घाव

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील हरसूल येथे नातवानेच आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लहानाच मोठं केलेल्या नातवाकडूनच आजीचा खून झाल्याने सर्वअत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गंगूबाई रामा गुरव असे मृत आजींचे नाव आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मारेकर्‍याला ताब्यात घेतले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, गंगूबाई रामा गुरव (वय 70) या वृद्धा आपल्या नातूसह राहात होत्या. बुधवारी (दि. २४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या वादात नातू दशरथ गुरव याने आजीच्या उजव्या डोळ्याजवळ हातात घातलेल्या लोखंडी कड्याच्या सहाय्याने जोरदार वार केले. यात आजी गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात नेण्यता आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषिक केले. यानंतर गंगूबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक झिरवाळ, पोलीस कर्मचारी जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

गुन्हेगारीचा आलेख कमी होईना

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीने डोके वर काढलेले दिसून येतेय. चोरी, लुटमार, अपहरण, खूनाच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. अशातच आता ग्रामीण भागही गुन्हेगारीत मागे नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील येवला, देवळा, मालेगाव, इगतपुरी आदी भागात गुन्हेगारीच्या अधिक घटना सातत्याने घडत आहेत. तस्करीच्या घटनांमुळे चर्चेत असणार्‍या पेठ, हरसुलसारख्या शहरांनाही आता या घटनेने गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागातही पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.