घरमहाराष्ट्रनाशिकहरणबारी धरण भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू..

हरणबारी धरण भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू..

Subscribe

मोसम नदीस पाणी आल्याने परिसरात होत आहे समाधान व्यक्त

हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरल्याने मोसम नदीपात्रात सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून आहे. धरण भरल्याने मोसम परिसरातील शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

मोसम परिसरातील पाण्याचा प्रश्न हा सर्वस्वी हरणबारी धरणावर विसंबून आहे. उन्हाळ्यात संपूर्ण मोसम परिसर पाणीप्रश्नाने ग्रासला होता. त्यात पावसाळा लांबला यामुळे पाणीप्रश्नाची झळ चांगलीच सोसावी लागली. शेती व्यवसाय तर पाणीटंचाईमुळे ठप्प झाला. तब्बल आठ ते दहा दिवसांनी नळ पाणीपुरवठा योजनांमधून पाणी येत होते. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. अशा भयानक परिस्थितीला जनता सामोरी गेली असताना लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातून हरणबारी धरण कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेकडो क्यूसेस पाणी नदीद्वारे वाहून जात होते. यामुळे गेटच्या दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.

- Advertisement -

हरणबारी धरणातून वर्षभरात सोडण्यात येणा-या पाण्याच्या रोटेशनवरच मोसम परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा पावसाळा लांबला, उन्हाळ्यात व पावसाळ्यातही पाणीप्रश्न कायम असल्याने मोसम परिसरातील जनता हैराण झाली होती. जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाला सुरुवात झाली होती. बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या संततधारेमुळे धरण १०० टक्के भरले आहे. हरणबारी धरणाचे पूरपाणी मोसम नदीला आल्यामुळे परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

मोसम खोऱ्यातील ८० हून अधिक गावांना फायदा

हरणबारी धरणातून सटाणा व मालेगाव या दोनही तालुक्यांतील मोसम नदीकाठावरील सुमारे ८०हुन अधिक गावांना रब्बीच्या पिकासाठी व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाते. त्यामुळे धरण भरल्याने मोसम नदीकाठावरील गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोसम नदीपात्रात कुणीही अधिकृत बांध घालून पाणी अडवू नये, अथवा वीजमोटारच्या सहाय्याने पाण्याची चोरी करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

- Advertisement -

कोरडेठाक असलेले धरण सहा दिवसांत भरले

पंधरा दिवसांपूर्वी हरणबारी धरण कोरडेठाक होते. साल्हेर, गोळवाड, वाघंबा परिसरात झालेल्या दमदार पावसाने धरण पूर्णतः भरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर चांगला असल्याने धरण भरण्यास मदत झाली आहे. मोसम नदीपात्रात ८५० दशलक्ष घनफूट विसर्ग सोडण्यात आल्याने मोसम नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोसम नदी पात्रात तासाला पाणी वाढत आहे.

“हरणबारी धरणाचे पूरपाणी उजव्या कालव्यात सोडण्यात यावे व कालव्याच्या क्षेत्रातील सर्व लहान-मोठे तलाव भरून द्यावेत म्हणजे पुढील काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मदत होईल.” – वसंत पवार, उपसभापती, पंचायत समिती बागलाण.

“हरणबारी धरणाच्या डाव्या कालव्याचा परिसरात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली होती. अजूनही परिस्थिती कायम असल्याने कालव्याद्वारे पाणी दिल्यास जायखेडा येथील पाझर तलाव व परिसरातील छोटे-मोठे तलाव भरून समस्या सोडविण्यास मदत होईल.” – शांताराम अहिरे, सरपंच, जायखेडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -