घरमहाराष्ट्रनाशिक‘सेंद्रिय महोत्सवा’ला नाशिककरांचा प्रतिसाद

‘सेंद्रिय महोत्सवा’ला नाशिककरांचा प्रतिसाद

Subscribe

रोटरी क्लब ऑफ नाशिक गंजमाळ संस्थेतर्फे आयोजन, सेंद्रिय शेतमालाची नाशिककरांना भुरळ

कुठल्याही रासायनिक खते, किडनाशकांचा स्पर्शही नसलेला सेंद्रीय भाजीपाला शहरी ग्राहकांना मिळावा. सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांनाही थेट ग्राहक मिळावेत. या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नाशिक गंजमाळने नुकताच येथील रोटरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या ‘सेंद्रिय महोत्सवा’ला नाशिककरांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. १८ शेतकरी गटांचा सर्व प्रकारचा भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबडच यावेळी उडाली.

रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सेक्रेटरी मुग्धा लेले, गौरी पाठक, मकरंद चिंधडे, कम्युनिटी संचालक हेमराज राजपूत, माजी अध्यक्ष विवेक जायखेडकर, दिलीप सिंह बेनिवाल, संतोष साबळे यांच्या उपस्थितीत सकाळी १०ला महोत्सवास प्रारंभ झाला. शनिवारी २६ जानेवारीला झालेल्या या सेंद्रीय महोत्सवात पालेभाज्या, फळभाज्या, विदेशी भाजीपाला, विविध प्रकारच्या दाळी, कडधान्ये, द्राक्षे, स्ट्रॉबेरी सारखी फळे, घाण्याचे तेल, देशी गाईचे दूध, पंचगव्य आदी उत्पादनांची मांडणी करण्यात आली. यात १८ शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. संपूर्णा सेंद्रिय शेतकरी गट, देवनदी व्हॅली अ‍ॅग्री कंपनी यासह शेतकरी उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळी उत्पादने मांडली. सुरगाणा तालुक्यातील पोहाळी येथील सोमनाथ मल्हार दळवी यांची आकर्षक पनेट मधील लालचुटूक स्ट्रॉबेरी ही महोत्सवाची आकर्षण ठरली. महोत्सवाच्या दिवशी दुपारी ३ पर्यंत दळवी यांंनी आणलेली ८० टक्के स्ट्रॉबेरी विकली गेली होती. जोपूळ, चांदवड, येवला, दिंडोरी, मालेगाव, निफाड, सिन्नर तालुक्यातील जायगाव, जोगलटेंभी, इगतपुरी तालुक्यातील मुरंबी या भागातून ताजा सेंद्रिय शेतमाल महोत्सवात आणण्यात आला होता. रास्त दरात थेट शेतकर्‍यांकडून सेंद्रीय शेतमाल मिळाल्याने नाशिक शहरातील ग्राहकांनी दिवसभर या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

- Advertisement -

प्रमाणिकरण झालेल्या शेतकरी गटांचाच सहभाग

नाशिक जिल्ह्याच्या काही भागात सेंद्रीय शेतीचे प्रयोग सुरू आहेत. अशी शेती करणार्‍या शेतकर्‍यांना एकत्रित करुन सेंद्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सेंद्रीय शेतीतील प्रमाणिकरण असलेल्या शेतकरी गटांचाच यात सहभाग होता. प्रत्येक आठवड्यातून एकदा असा महोत्सव व्हावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. – हेमराज राजपूत, संचालक, कृषी विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -