घरमहाराष्ट्रनाशिकअ‍ॅडमिशनचा खेळखंडोबा!

अ‍ॅडमिशनचा खेळखंडोबा!

Subscribe

जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थ्यांचे दाखले सेतूकडे प्रलंबित आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून व्यावसायिक अभ्यासक्रमासह एकूणच प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येते.

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसीसह व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सर्व्हर डाउन झाल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील महा-ई-सेवा, आपले सरकार केंद्रांतून देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच आता ‘महाऑनलाइन’ सॉफ्टवेअरच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सर्व्हर ठप्प झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २० हजार विद्यार्थ्यांचे दाखले सेतूकडे प्रलंबित आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून व्यावसायिक अभ्यासक्रमासह एकूणच प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येते.

सर्व्हर ठप्प : २० हजार दाखले प्रलंबित

महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असतानाच आता ‘महाऑनलाइन’ सॉफ्टवेअरच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सर्व्हर अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे महा-ई-सेवा केंद्रचालक मेटाकुटीस आले आहेत. परिणामी, हजारोंच्या संख्येने दाखल अर्जांचा निपटारा करण्यात अडचणी येत असून विद्यार्थी-पालक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाल्याने सुमारे २० हजार दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे दाखल्यांसाठी आता अधिकार्‍यांच्या दालनांबाहेर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात सेतू कार्यालय बंद झाल्यामुळे आता महा-ई-सेवा केंद्रांमार्फत दाखले देण्याचे काम सुरू आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गंत महा ऑनलाइनने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्येच विविध शासकीय दाखले तयार करावे लागतात. सध्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थी, पालकांकडून उत्पन्न, नॉनक्रिमिलेअर, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, जातींच्या दाखल्यांसाठी दिवसाकाठी शेकडो अर्ज गावोगावच्या महा-ई-सेवा केंद्रचालकांकडे सादर केले जात आहेत. शासन नियमानुसार आठ दिवसांच्या आत अर्जदारास दाखला देणे बंधनकारक असले तरी, महाऑनलाइनची यंत्रणा कोलमडून पडली असून, तीन दिवसांपासून ही प्रक्रिया पूर्ण ठप्प झाली आहे. सर्व्हरमध्ये राज्य पातळीवरच तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाऑनलाईन केंद्रात दाखले घेण्यासाठी नागरिकांना दाखले मिळत नसल्याने केंद्र चालक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. शुक्रवारी (दि.२१) सकाळी काही वेळ सर्व्हर सुरू झाले. मात्र, दाखल्यांची प्रत येत नसल्याचे दिसून आले. सध्या दाखल होणार्‍या अर्जांच्या तुलनेत निपटारा होण्याचे प्रमाण कमी असल्याने प्रलंबित दाखल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व्हर डाउन असल्यामुळे तसेच सॉफ्टवेअरच्या तांत्रिक दोषामुळे केंद्रातील कर्मचारीही हातावर हात ठेवून आहेत.

दाखले वेळेत देण्याबाबत सूचना

प्रशासनाने दखल घेत आजच यासंदर्भात बैठकही घेतली. सर्व्हरमध्ये राज्य पातळीवरच तांत्रिक दोष निर्माण झाल्याने दाखले वितरणात अडचणी येत आहेत. यासंदर्भात महाऑनलाईनचे नेटवर्क हाताळणार्‍या अधिकार्‍यांना तातडीने कळवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सांगण्यात आले आहे. सर्व अधिकार्‍यांना दाखले वेळेत देण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहेत.  – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.

- Advertisement -

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया रद्द

सोमवारपासून नव्याने अर्ज; अडीच लाख विद्यार्थ्यांना सर्व्हर डाउनचा फटका

अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्रासह व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जांमध्ये तांत्रिक चुका असल्यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांना सोमवार (दि. २४) पासून नव्याने अर्ज भरावे लागतील. सर्व्हर बंदमुळे विद्यार्थी व पालकांना अगोदरच मनस्ताप झालेला असताना त्यात सुधारीत वेळापत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करावे लागणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ‘सार’ पोर्टलवर जनरल रजिस्ट्रेशन व सीईटी पोर्टलवर प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे (कॅप) काम सुरू करण्यात आले होते. प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. त्यांची दखल घेत सीईटी सेलच्या आयुक्तांनी सर्व्हर सांभाळणार्‍या एजन्सीसमवेत गुरुवारी (दि.२०) रात्री बैठक घेतली. विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना भरलेली माहिती एकत्रितपणे संलग्नित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आजवर विद्यार्थ्यांना अर्ज व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सुविधा केंद्रांवर (एफसी) व रिपोर्टिंगसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात केंद्र देण्यात आले होते. या केंद्रांना पर्याय सूचवत राज्य सरकारने प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र उभारले. व्यावसायिक श्रेणीमध्ये एकूण ५३ अभ्यासक्रमांची प्रक्रिया एकाच वेळी सुरू होऊन त्याचा सर्व्हरवर ताण आल्यामुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया रखडली. परिणामी, सीईटी सेलवर ही प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की आली आहे. याविषयी तातडीने अध्यादेश काढत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज सादर करावे लागतील.

वेळ आणि पैसेही व्यर्थ

सीईटी परीक्षा दिलेल्या ४ लाख विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, हॉटेल व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, अशा विविध अभ्यासक्रमांसाठी तासन् तास सेतू केंद्रावर बसून नोंदणी केली आहे. मात्र, आता वेळ आणि पैसे फुकट गेल्याने पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -