घरमनोरंजनआधुनिक सुधाकराची रटाळ गोष्ट; 'कबीर सिंग'!

आधुनिक सुधाकराची रटाळ गोष्ट; ‘कबीर सिंग’!

Subscribe

हिंदी पडद्यावर जुन्या जमान्यातल्या ‘देवदास’पासून ते, अमानुष, शराबी, आशिकी 2 अशी मद्यपींच्या अधःपतनातील नायकाच्या चित्रपटांची परंपरा आहे. कबीर सिंग हा त्याच रांगेतला चित्रपट म्हणून समोर येतो.

माणसाच्या नैतिक अधःपतनाच्या कारणांची चर्चा नाटककार शेक्सपिअरने खूप आधीच करून ठेवली होती. मद्याचं व्यसन हे त्यातलं एक महत्वाचं कारण असल्याचं कथानक व्ही शांताराम यांच्या पिंजरा आणि राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला नाटकातून स्पष्ट झालं होतं. हिंदी पडद्यावर जुन्या जमान्यातल्या ‘देवदास’पासून ते, अमानुष, शराबी, आशिकी 2 अशी मद्यपींच्या अधःपतनातील नायकाच्या चित्रपटांची परंपरा आहे. कबीर सिंग हा त्याच रांगेतला चित्रपट म्हणून समोर येतो. या बहुतांशी मद्यपी पटांचे नायक कुठल्याश्या असह्य दुःखावेगामुळे एकच प्याल्यात स्वतःला बुडवून घेतात. यातलाच कबीर सिंगही, मात्र अशक्त कथा, ढिसाळ पटकथेमुळे दिग्दर्शक संदीपचा चित्रपट कमालीचा रटाळ होतो. त्यातच चित्रपटांच्या विनाकारण लांबवलेल्या प्रसंगामुळे कबीरचं नैराश्य प्रेक्षकांमध्येही पसरू लागतं.

दोन वर्षापूर्वी आलेल्या तेलुगू चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक असलेल्या या चित्रपटातील नायक डॉक्टर कबीर सिंग (शाहीद कपूर) एमबीबीएसच्या पुढच्या वैद्यकीय शिक्षणाच्या पदवीसाठी दिल्लीतल्या एका मेडीकल कॉलेजमध्ये शिकतोय. इथल्या हॉस्टेलमध्ये तो राहतो, त्याच ठिकाणी प्रीती (कियारा अडवाणी) ही एमबीबीएससाठी दाखल होते. कबीरला ती आवडते, तिलाही तो आवडतो, पुढे त्यांच्या प्रेम होतं. आता यात प्रेम होण्याच्या प्रसंगांनी चित्रपटाचा 40 टक्के भाग व्यापला जातो, मग श्रुतीच्या घरच्यांचा लग्नाला होणारा विरोध त्यामुळे निर्माण होणारा विरह, त्यातून दारू आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला कबीर…यात कबीरचं दारुच्या आहारी जाण्याच्या प्रसंगांनी चित्रपटाचा अर्धाअधिक भाग भरलेला आहे. त्यामुळे सोबतच चित्रपटाला कथानकच नसल्यामुळे दारु पिण्याचे एकामागोमाग एक येणारे प्रसंग डोईजड होतात. त्यामुळे चित्रपट रटाळ आणि संथ होतोच, पण सोबत दिग्दर्शकाची उरल्या सुरल्या कथानकावरची पकडही ढिली पडते.

- Advertisement -

चित्रपटातील गाणी सुसह्य आहेत. मध्यंतराच्या आधी रोमँटीक दृश्यांनी भरलेला पडदा आणि मध्यंतरानंतर दारुचे ग्लासवर ग्लास रिचवणारा कबीर याशिवाय पडद्यावर काहीच उरत नाही. हा चित्रपट नैतिक अधःपतनातून घडणार्‍या शोकांतिकेचा नाही. त्यामुळेच भावनातिरेक, हाणामारी, कॉलेजची मैत्री असल्या प्रसंगांचा पट म्हणजे कबीर सिंगचा पडदा. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतला शाहीदच पडदा व्यापून राहतो. डॉक्टरही माणसंच असतात, त्यांच्याकडूनही भावनावेगात चुका होऊ शकतात, असंच काहीसं सांगण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. मात्र, हा प्रयत्न तोकडा पडतो. शाहीदचा सहजाभिनय हीच काय ती जमेची बाजू, मात्र ही कॉलेजवयातली निव्वळ प्रेमकथा नाही. याबाबत दिग्दर्शकाचं कौतूक करायला हवं. प्रेम आणि लग्नाचं जोडलं गेलेलं नातं, यातल्या धूसर सीमारेषेवर चित्रपट रेंगाळत राहतो. हे रेंगाळणं कमालीचं लांबवल्यामुळे कबीर सिंगचा परिणाम पुरेसा साध्य होत नाही. डॉक्टरसारख्या व्यावसायातली माणसंही दुःख आवेग आणि भावनिकतेच्या लाटेत स्वतःच्या आरोग्याबाबत कमालीची बेफिकीर होऊ शकतात. हे शाहीदने अभिनयातून पटवून दिलं आहे. मात्र कथानकातून त्याची मैत्रीण श्रुती मध्यंतरानंतर अचानक गायब कशी होते, याचं पुरेसं स्पष्ट उत्तर मिळत नाही. जुन्या देवदासच्या आजच्या जमान्यातील बदल म्हणजे कबीर सिंग, असं म्हणावं लागतं. मात्र, मुख्य कथानकाला जोडून येणारी उपकथानकं आणि व्यक्तीरेखांना वावच नसल्यामुळे चित्रपट कमालीचा रटाळ झाला आहे. प्रेमभंगातून मद्यपानाच्या आहारी गेलेल्या कबीर नावाच्या आधुनिक सुधाकराच्या चित्रपटची धुंद प्रेक्षकांना चढत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -