घरमहाराष्ट्रनाशिकमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन

Subscribe

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होणे, हे समाजाचे अपयश : उत्तम कांबळे

नाशिक : प्रत्येक घटनेमागे कारण असते आणि प्रश्न उपस्थित केल्याशिवाय  कोणत्याही घटनेमागील सर्व कारणांचा शोध घेता येत नाही.  म्हणून समाजात वावरताना विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समाजाशी सुसंवादीत राहून, प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. समाजाला समजून घेता घेता प्रश्न विचारण्याची संस्कृती विकसित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकृत  मुखपृष्ट असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन करताना केले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र अंनिस ही एक विवेकवादी चळवळ आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून होणे, हे समाजाचे अपयश आहे. तथापि, मागील  ३०-३२ वर्षांपासून चळवळीचा विवेकी विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत. आपले जीवन विवेकी पद्धतीने जगायचे असेल, तर नवयुवकांनी जाणीवपूर्वक स्वतःला अशा चळवळींमध्ये जोडून घ्यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, समाजकार्य विषयाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा अग्रस्थानी ठेवूनच समाजात उतरावे लागते. कारण आपला समाज हा परंपरागत रुढी, प्रथा यांची कोणतीही चिकित्सा न करता, त्या जशाच्या तशा जोपासण्यात धन्यता मानतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.  सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. समीर शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे यांनी केले.यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे  विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, संघटनेचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, विजय खंडेराव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -