घरमहाराष्ट्रनाशिक३ महिन्यात नाशिककरांनी रिचवले ९०कोटी लिटर जादा पाणी

३ महिन्यात नाशिककरांनी रिचवले ९०कोटी लिटर जादा पाणी

Subscribe

उन्हाचा तडाखा वाढल्याचा परिणाम

नाशिक : उन्हाच्या तडाख्याने नाशिककरांचे घसे कोरडे केले असून ही तहान भागविण्यासाठी शहरवासियांनी तीन महिन्यात तब्बल ९० कोटी लिटर पाण्याचा अतिरीक्त वापर केल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उन्हामुळे नाशिककरांच्या पाणी मागणीत वाढ झाल्याने गंगापूर व मुकणे धरणातून दररोज १० दशलक्ष लिटर पाण्याची उचल वाढवण्यात आली आहे. धरणांतून दररोज सरासरी ५३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उचलला जातो. सद्यस्थितीत ५४० दशलक्ष लिटर पाण्याची उचल केली जात आहे. नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह, मुकणे धरण आणि काही प्रमाणात दारणा धरणातून चेहेडी नदीपात्रातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर ते ३१ जुलै या कालावधीसाठी धरणांतील पाणीसाठा आरक्षित केला जातो.

यंदा नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरण समूहातून ४००० दशलक्ष घनफूट, मुकणेतून १५०० दशलक्ष घनफूट तर दारणेतून १०० दशलक्ष घनफूट अशाप्रकारे ५६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी १८ एप्रिल २०२२ पर्यंत गंगापूर धरण समूहातून २७०३ दशलक्ष घनफूट, तर मुकणेतील ८४६ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा वापर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात १२९६ दशलक्ष घनफूट, मुकणेत ६५३ दशलक्ष घनफूट तर दारणेतील १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. यंदा उन्हाळयात गतवर्षीच्या तुलनेत तपमान २ ते ३ सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने शहरवासियांचा पाणी वापरही वाढला असून वाढलेल्या पाणीमागणीचा विचार करून महापालिकेतर्फे धरणांतून पाण्याची उचल वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

एरवी नाशिककरांना दररोज सरासरी ५३० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा धरणांतून केला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी दहा दशलक्ष लिटर पाण्याचा अतिरीक्त पुरवठा शहरवासियांना केला जात असल्याने धरणांतून दररोज १० दशलक्ष लिटर पाण्याची अतिरीक्त उचल केली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत नाशिककरांनी तब्बल ९० कोटी लिटर पाण्याचा अतिरीक्त वापर केल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुढील सव्वातीन महिन्यात आणखी सुमारे १०० कोटी लिटर पाण्याचा अतिरीक्त वापर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -