घरमहाराष्ट्रनाशिकसानपांना स्वपक्षातूनच आव्हान

सानपांना स्वपक्षातूनच आव्हान

Subscribe

पूर्व मतदारसंघात भाजपातून ईच्छुकांची भाउगर्दी ः मनसे, वंचित आघाडीच्या भुमिकेकडे लक्ष

मोदी लाटेत भाजपच्या बाजूने कौल देत नाशिक पूर्व मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार बाळासाहेब सानप हे विजयी झाले. नाशिक महापालीका निवडणूकीत तिकिट वाटपापासून ते सत्ता स्थापन करणे, पुढे महापौरपद ते स्थायी समिती सभापती पदापर्यंतची सर्व महत्वाची पदे त्यांनी आपल्या मतदारासंघात ओढून आणली. मात्र सानप यांच्या या राजकिय खेळीने पक्षांतगर्र्त धुसफुस मोठया प्रमाणवर वाढल्याने पक्षात सानप विरोधी गट सक्रिय झाला. मध्यंतरीच्या काळात बरयाच उलथापालथ झाल्याने तसेच सानप आणि पालकमंत्री महाजन यांच्यात फारसे सख्य राहीले नसल्याच्या चर्चेने या मतदारसंघात सानपांना रोखण्यासाठी भाजपांर्तगत मोठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे विरोधकांपेक्षा आमदार सानपांना स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकले आहे याचा सामना सानप कसा करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणूकीत मनसे आणि २०१४ च्या निवडणूकीत भाजपच्या बाजूने कौल देणारया नाशिक पूर्व मतदारसंघात पंचवटी, मळेपरिसर आणि नाशिकरोडचा जेलरोड असा संमिश्र भागाचा सामावेश करण्यात आला आहे. गेल्या साडेचार वर्षाच्या काळात या मतदारसंघाने मोदी लाटेवर स्वार होत भाजपला कौल दिला. महापालीका निवडणूकीत या मतदारसंघात ३६ पैकी २९ प्रभागांत भाजपचे वर्चस्व दिसून आले. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीतही युती झाल्यास भाजपाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जाईल हे निश्चित. अर्थात ज्या जागा भाजपाकडे आहेत त्या तशाच ठेवून इतर जागांवर फिफटी फिफटीचा युतीचा फॉर्मुला असल्याने नाशिक पूर्वची जागा भाजपच लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. गेली २० वर्ष भाजपात काम करतांना गटनेता, सभागृहनेता, स्थायी समिती सदस्य, उपमहापौर, महापौर, शहराध्यक्ष, भटक्य विमुक्त जाती जमाती समितीचे अध्यक्ष आणि आमदार अशी पद भुषवणारे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे वर्चस्व आहे. सर्वाधिक निधी मिळवून देत मतदारसंघात विकास कामे केल्याचा दावा सानपांकडून केला जात आहे. असे असले तरी, सर्व महत्वाची पदे आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना मिळवून देत सानपांनी इतरांची नाराजी ओढून घेतली. यातूनच अन्याय केल्याच्या भावनेने सानपांंविरोधात पक्षात स्वतंत्रगट सक्रिय झाला. त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी सानपांचे फारसे सख्य राहीले नसल्याचे बोलले जाते. ही बाब विरोधकांना बळ देणारीच ठरली आहे त्यामुळेच सानपांविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडेच तक्रारी करण्यात आल्याचे समजते. महाजनांनीही सानप विरोधकांना जवळ केल्याने सानपांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

- Advertisement -

सानप सोडून कुणीही उमेदवार द्या असाही सुर पक्षातून आळवला जात आहे. म्हणूनच आता भाजपातून अर्ध्या डझनहून अधिक इच्छुकांची नावे चर्चेत आली आहे. यात स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, गणेश गिते, सुनिल आडके, ज्येष्ठ नगरसेवक अरूण पवार, महापौर रंजना भानसी, यांची नावे चर्चेत आहेत. यात निमसे यांना स्थायी समिती सभापतीपदी संधी दिल्याने त्यांचे नाव बाद होण्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे मराठा व बिगर मराठा असाही सुप्त संघर्षातून पक्षाला फटका बसू शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे. ऐनवेळी युती दुभंगली तर सेनेकडून देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, चंद्रकांत लवटे यांच्या नावाची चर्चा आहे गत निवडणकीत लवटे यांना दुसरया क्रमांकाची मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीकडून देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, गौरव गोवर्धने आदिंच्या नावाची चर्चा आहे. २०१४ च्या निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना ७९ हजार ७३१ तर छगन भुजबळ यांना ४७ हजार १११ मते मिळाली. यंदा या मतदारसंघाने खासदार गोडसे यांना ७६ हजार २६८ मतांची आघाडी दिली. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत मोदी फॅक्टचा प्रभाव या मतदारसंघावर राहील असे चित्र आहे.

मनसे, वंचितची भुमिका निर्णायकी

लोकसभा निवडणूकीत २४ हजार मते घेणारया वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा निवडणूकीतही आघाडीची भुमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. तुर्तास तरी या मतदारसंघातून पवन पवार, डॉ. संजय जाधव, आणि संतोष नाथ यांची नावे चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूकीत मोदी, शहांच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मतदारसंघातून मनसेचे राहुल ढिकले दावेदार मानले जातात. गेल्या साडेचार वर्षांपासून ढिकले यांनी या मतदारसंघात दोैरे करून संपर्क ठेवला आहे. २००९ च्या निवडणूकीत राहुल यांचे वडील अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांनी एकहाती विजय मिळवला. अर्थात मनसेची फारशी ताकद राहीलेली नाही अर्थात ढिकलेंशिवाय विरोधकांकडे सक्षम उमेदवाराची वानवा आहे.

- Advertisement -

काँग्रेस, राष्ट्रवादीचा या मतदारसंघात फारसा प्रभाव नाही त्यामुळे आघाडीकडून या मतदारसंघात फारसे इच्छुक नाही त्यात मनसे आघाडीत गेल्यास ही जागा ढिकलेंसाठी मनसेला सोडण्यात येणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढिकलेही संभ्रमात असल्याचे दिसून येते. मनसेच्या आघाडीच्या नेत्यांपैकी ढिकले एक मानले जातात मात्र आता त्यांनी आपल्या पोस्टरवरून राज ठाकरेंचा बॅनर काढून प्रचार सुरू केल्याने ढिकलेंच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे याबाबत मात्र त्यांनी मौन साधणेच पसंत केले आहे.

भौगोलिक रचना

नाशिकरोड, जेलरोड, दसक पंचक, नांदूर मानूर, मातोरी, दरी, आडगाव, मखमलाबाद, म्हसरूळ, पंचवटी या प्रमुख भागांचा मतदारसंघात सामावेश आहे. मळे परिसर, झोपडपटटी, व मध्मवर्गींयाबरोबरच मोठया प्रमाणावर असलेल्या प्रेस कामगारांची मते निर्णायक ठरतील. पूर्वी या मतदारसंघाचा काही भाग हा देवळालीत समाविष्ट होता. तेथे शिवसेनेला सलग पाच निवडणूकांमध्ये कौल मिळाला. त्यानंतर मागील पंचवार्षिकमध्ये पूर्व मतदारसंघ अस्तित्वात आला. साधारपणे ३ लाख १७ हजार ९०० लोकसंख्या या मतदारसंघात कोणत्याही एका जातीचा निर्णायक प्रभाव नसला तरी मराठा समाज तुलनेने अधिक आहे. पाठोपाठ दलित, वंजारी, गुजराथी समाजाचे प्राबल्य आहे. तबल ६३ छोटया, मोठया जातींचा या मतदारसंघात समावेश आहे.

२०१४ चा विधानसभा निकाल
बाळासाहेब सानप (भाजप) ७८,५५४
चंद्रकांत लवटे (शिवसेना) ३२,४४७
उध्दव निमसे (काँग्रेस) १९,४४२
देविदास पिंगळे (राष्ट्रवादी काँग्रेस) १२,९००
रमेश धोंगडे (मनसे) १२,४३७

२०१९ लोकसभा चा निकाल
हेमंत गोडसे (शिवसेना) १,१७,१२७
समीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) ४०,८५९
माणिकरा कोकाटे (अपक्ष) ६६६६
पवन पवार (वंचित बहुजन आघाडी) २४,७६४

मतदारसंघातील प्रश्न

* नाटयगृह नाही.
* बिटको रूग्णालयाचे रखडलेले बांधकाम.
* कागद कारखान्याचा रखडलेला प्रश्न
* सर्वाधिक गुन्हेगारीचा विभाग, अवैधधंद्यांचा सुळसुळाट
* तपोवनातील साधुग्रामच्या भूसंपादनाचा प्रश्न.
* मलनिस्सारण केंद्रातून दुषित पाण्याचा वाढता प्रार्दुभाव.
* म्हसरूळ, आडगाव, दसक येथील गावठाणांचा रखडेलेला विकास.
* के.के.वाघ जवळील उडडाणपुलाचे धिम्या गतीने सुरू असेलेले काम.
* सर्वाधिक झोपडपटटी असलेला विभाग.
* म्हसरूळ आडगाव रिंगरोडचे अपुर्ण काम
* मतदारसंघातील रस्त्यांचे अपुर्ण कामे
* औरंगाबादरोडवरील लॉन्स समोरील वाहतुक कोंडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -