घरमहाराष्ट्रनाशिकराम रथयात्रेची तयारी अंतिम टप्प्यात; राम भक्तांचा उत्साह शिगेला

राम रथयात्रेची तयारी अंतिम टप्प्यात; राम भक्तांचा उत्साह शिगेला

Subscribe

नाशिक : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या रथोत्सवास आज (दि.२) सायंकाळी साडेचार वाजता काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून प्रारंभ होणार आहे. यात श्रीराम व गरुड अशा दोन रथांचा समावेश असतो. दोनही रथांचे यंदाचे मानकरी समीर बुवा पुजारी यांच्याहस्ते विधिवत पूजन केले जाणार आहे. प्रथम गरुड रथ मार्गस्थ झाल्यानंतर श्रीराम रथ त्यापाठोपाठ नगर परिक्रमेसाठी निघणार आहे.

पेशवे काळात नाशिक मुक्कामी असलेल्या गोपिकाबाई पेशवे यांनी केलेला नवस पूर्ण झाल्याने काळाराम मंदिरास श्रीराम रथ अर्पण केला होता. त्याची देखभाल करण्यासाठी पेशवे यांचे नात्याने मामा असलेल्या सरदार रास्ते यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार आजही मालवीय चौक परिसरात उभ्या असलेल्या श्रीराम रथाची देखभाल रास्ते आखाडा तालीम संघ करीत आहे. तर रथोत्सवात रथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ व पाथरवट समाज यांच्याकडे आहे. या श्रीराम रथात प्रभू रामचंद्र यांच्या उत्सव मूर्ती मानकरी बुवा यांच्याहस्ते विधिवत ठेवल्या जातात. याच रथापुढे मानकरी बुवा उलट दिशेने मार्गक्रमण करीत असतात.

- Advertisement -

श्रीरामाचे नवरात्र सुरू असल्याने, रामरथ गोदावरी नदी ओलांडून पलीकडे जात नाही. यामुळे हा रथ गाडगे महाराज पुलाजवळील म्हसोबा पटांगणावर उभा राहतो. तर गरुड रथाची देखभाल करण्याची जबाबदारी काळाराम मंदिर संस्थानची असून, हा रथ ओढण्यासाठी अहिल्याराम व्यायामशाळा यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. या रथात हनुमान विराजमान करून, हा रथ नदी ओलांडून नगर परिक्रमा करून पुन्हा म्हसोबा पटांगणावर येऊन रामरथच्या पुढे मार्गक्रमण सुरू करतो. रामकुंडावर उत्सव मूर्तींना अवर्भूत स्नान, अभिषेक केला जातो. याचवेळी सामान्य नाशिककरांना उत्सव मूर्तींना स्नान घालण्याची सुवर्ण संधी असते. यानंतर रथ काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा याठिकाणी आल्यावर, पुजारी घराण्यातील सुवासिनींच्या हस्ते रामाचे विधिवत पूजन करून दृष्ट काढली जाते. राथयात्रेनंतर काळाराम मंदिर वासंतिक नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते.

असा असेल मार्ग

रथोत्सवाच्या पूर्व संध्येला अर्थात शनिवारी (दि.१) सायंकाळी सहा वाजता श्रीराम रथ पुरिया मार्गाकडून मालवीय चौक, शिवाजी चौक, पाथरवट लेन, नागचौक, ढिकले नगर या मार्गावरून काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे आणण्यात आला. या मार्गात ठिकाठिकाणी रथाचे स्वागत करण्यात आले. मार्गात दुतर्फा विविध ठिकाणी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नागरिकांनी घरांवर गुढ्या उभारीत संपूर्ण मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी पारंपारिक ढोल-ताश्यांच्या गजरात व पारंपरिक गणवेश परिधान करून रथाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -