घरमहाराष्ट्रनाशिककिकवी प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात ६४ कोटींची तरतूद

किकवी प्रकल्पाला गती देण्यासाठी अर्थसंकल्पात ६४ कोटींची तरतूद

Subscribe

महाविकास आघाडीकडून अपेक्षा उंचावल्या

शुभांगी खेलूकर , नाशिक : तब्बल १३ वर्षे रखडलेल्या महत्वकांक्षी किकवी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६४ कोटींची तरतूद करण्यात आल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. २००८ मध्ये किकवी प्रक्रियेस सुरूवात झाली होती. आघाडी सरकारने हा प्रकल्प मंजूर केला. त्यानंतर तत्कालीन भाजप सरकारने हा प्रकल्प गुंडाळला मात्र, आघाडी सरकारनेच आता या प्रकल्पासाठी निधीची तरतूद केल्याने लवकरच या प्रकल्पाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे व ब्राह्मणवाडे परिसरात किकवी धरण प्रस्तावित आहे. किकवीसाठी केंद्राच्या नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियांनातर्गत मान्यता मिळाली होती. त्यावेळी २०२१ पासून नाशिक शहराला पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. प्रारंभी प्रकल्पाचा निम्मा निधी नाशिक महानगरपालिकेने करावा असे ठरले होते, पण नंतर पालिकेने नकार दिला. या प्रकल्पास १०० टक्के निधी शासनाने खर्च करावा असे पालिकेने सूचवले होते.

- Advertisement -

तत्कालीन भाजप सरकारने किकवी प्रकल्प गुंडाळला. परंतू आता महाविकास आघाडी सरकारने किकवीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केल्याने पुन्हा एकदा किकवी प्रकल्पाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेचा पाणीसाठा २४८५ दलघफु असून २१२० दलघफु उपयुक्त साठा असणार आहे. या प्रकल्प क्षेत्रात १७२.४६८ हेक्टर वनजमीन आणि १० गावांतील ७४०.०३२ हेक्टर खाजगी जमीन येते.

सुमारे १ हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे गंगापूर धरणावरील भार हलका होणार आहे. गंगापूर धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. धरणातील हा काळ काढण्यासाठी सुमारे १५०० कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. इतका पैसा खर्च करण्याऐवजी किकवी प्रकल्प उभारणे परवडणारे आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यात येणार आहे.

- Advertisement -

सध्या किकवी धरणाचे बहुतांशी प्रशासकीय कामकाज पूर्ण झाले आहे.या प्रकल्पाकरीता वनविभागाची जमिनीची आवश्यकता असून राज्य शासनाकडून वनविभागाला द्यावयाच्या निधीबाबत अर्थसंकल्पात तरतूदच नसल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात किकवीसाठी सुमारे ६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वनविभागाला संपादनापोटी ३६ कोटी देय आहे मात्र प्रस्तावित निधीतून कोणत्या एका यंत्रणेकरीता निधी प्रस्तावित न करता प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आल्याचे नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्या जगताप यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य

गंगापूर धरणात किकवी, गौतमी तसेच कश्यपी धरणाचे पाणी येते. किकवी नदी गंगापूर धरणाच्या वरील बाजूला असल्यामुळे या धरणाचा उपयोग नाशिकच्या पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठीही होणार आहे. किकवी नदीचे पाणी नियोजित किकवी धरणात अडविले जाईल. हे धरण पूर्ण भरल्यानंतर त्याचा विसर्ग गंगापूर धरणात होईल. त्यामुळे वारंवार येणार्‍या पुरामुळे नाशिक शहरात गोदाकाठी जी परिस्थिती निर्माण होते, त्यावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होणार आहे. तसेच, या धरणामुळे शेतकर्‍यांना शेतीतील प्रयोगांना हातभार लागणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प प्रस्तावित असून यासंदर्भात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत प्रकल्पासाठी तरतूद करण्याची मागणी केली. या प्रकल्पासाठी अर्थमंत्र्यांनी निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
– आमदार हिरामण खोसकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -