घरमहाराष्ट्रनाशिकराहुल गांधी सुजयला राष्ट्रवादीतून लढण्याचा सल्ला देत होते

राहुल गांधी सुजयला राष्ट्रवादीतून लढण्याचा सल्ला देत होते

Subscribe

राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सुटल्यास पक्षाचा एक खासदार वाढेल म्हणून जिवाचे रान करत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र, सुजयने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा सल्ला देत होते, असा धक्कादायक गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा स्विकारल्यानंतर शनिवारी (२७ एप्रिल) प्रथमच प्रसारमाध्यमांशी बोलताना विखेंनी मनातील ही सल बोलून दाखवली. ते म्हणाले, परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीने ही जागा डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसला द्यायला हवी होती. सुजयने मागील ३-४ वर्षांपासून याठिकाणी उत्तम बांधणी केली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने जाणीवपूर्वक ही जागा काँग्रेससाठी सोडली नाही. यासाठी काँग्रेसमधील काही नेतेही राष्ट्रवादीला सामील झाले होते. यासंदर्भात राहुल गांधी यांच्यासमवेत ज्या दिवशी भेट ठरली होती, त्याच दिवशी दुपारी शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विखे पाटील कुटुंबाबाबतची खुन्नस जाहीर बोलून दाखवली. वडिलांबाबत अनावश्यक विधाने केली. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी सुजयला राष्ट्रवादीत पाठवण्याचा सल्ला दिला. परंतु, राष्ट्रवादीची आमच्याबाबतची पूर्वग्रहदुषित मानसिकता लक्षात घेता राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणे ही राजकीय आत्महत्या ठरली असती, असे ते पुढे म्हणाले.

- Advertisement -

राज्यात अनेक घटना घडल्या, समस्या निर्माण झाल्या. बहुतांश ठिकाणी मी स्वतः धावून गेलो. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना वेळोवेळी मदत केली. त्यामुळे पक्ष माझ्या मागे उभा राहिल, अशी माझी अपेक्षा होती. पण ते झाले नाही. त्या पश्चातही शांत राहण्याचा निर्णय घेतला. सुजय मुलगा असला तरी नगरमध्ये जायचेच नाही, असे ठरवून टाकले. पण एकाच दिवसांत लक्षात आले, या निवडणुकीला राष्ट्रवादीकडून विखे विरूद्ध पवार, असे रूप दिले जाते आहे आणि अशा परिस्थितीत गप्प राहणे शक्य नव्हते. यामुळे सुजयला मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. ते म्हणाले, आपल्यावरून आघाडीत बिघाडी नको, या एकमेव कारणामुळे कुठेही प्रचाराला गेलो नाही. शिर्डी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात सातत्याने डावलेले गेले, असा आरोपही विखे पाटील यांनी केला.

श्रीरामपूरला आयोजित एका बैठकीत जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने दोन वाक्य बोललो होतो. पहिल्या वाक्यात म्हणालो होती, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेला आहे आणि दुसरे वाक्य म्हणजे काँग्रेस जणू खासगी प्रॉपर्टी झाली आहे. मात्र, चित्र असे उभे केले की, थेट पक्षनेतृत्वावरच टीका केली. शेवटपर्यंत संयमाने वागण्याचा प्रयत्न केला. पण काहीही झाले तरी चूक विखेंचीच, अशी भूमिका वारंवार घेतल्या गेल्यामुळे नाईलाज झाला आहे. निवडणूक संपली की, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. राज्यातील इतरही अनेक नेते मंडळी माझ्या संपर्कात आहेत. त्या सर्वांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -