घरमहाराष्ट्रनाशिकहोय, खेकड्यांमुळे धरणगळती!

होय, खेकड्यांमुळे धरणगळती!

Subscribe

मेरीचे निवृत्त वैज्ञानिक नामदेव पठाडे यांचे संशोधन ,वाघेरे आणि कुंडलिका धरणात यशस्वी प्रयोग

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे तर्क जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर नवा वाद उभा राहिला आहे. सर्वांनीच सावंत यांची खिल्ली उडवत सोशल मीडियावर रान पेटवले. प्रत्यक्षात धरणाची गळती होण्यास खेकडे कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी)ने यापूर्वीच एका संशोधनाच्या आधारे काढल्याची माहिती पुढे आली आहे. हे संशोधन करणारे निवृत्त वैज्ञानिक संशोधन अधिकारी नामदेव पठाडे यांनी नाशिक जिल्ह्यातील वाघेरे आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका डावा तट कालव्याचे निरीक्षण करून त्या आधारे संशोधन अहवाल तयार केला होता. ‘आपलं महानगर’ने पठाडे यांची भेट घेऊन या संशोधनाची माहिती घेतली.

तिवरे धरणफुटी खेकड्यांमुळे झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. परंतु खेकड्यांमुळे धरणगळती होऊ शकते, हे नाकारून चालणार नाही, हे मेरीच्या संशोधनातून स्पष्ट होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कश्यपी नदीवरील वाघेरे धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा प्रकार २००१ च्या सुमारास पुढे आला होता. या गळतीची कारणे जाणून घेण्याची जबाबदारी मेरीतील वैज्ञानिक संशोधन अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली होती. या वैज्ञानिकांनी धरणावर संशोधन करून अहवाल २००४ मध्ये सादर केला होता. दरम्यानच्या काळात रोहा येथील काळ प्रकल्पात कुंडलिका डावा तट कालव्यात आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरात गळती होत असल्याची माहिती देण्यात आली होती. या दोन्ही प्रकल्पांमधील गळतीचे संशोधन करण्याचे काम मेरीतील वैज्ञानिक संशोधन अधिकारी नामदेव पठाडे आणि त्यांच्या टीमकडे होते. त्यावेळी करण्यात आलेल्या निरीक्षणातून लक्षात आले की, मुरुमाच्या भरावात वा भिंतींमधील ठिसूळ भाग खेकडे पोखरतात. त्यामुळे भिंतीला छिद्रे पडतात आणि त्यातून पाणी गळती होते. पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढल्यावर हे छिद्रे मोठे होतात. अशा छिद्रांचे प्रमाण वाढत गेले, तर निश्चितच धरणाला धोका निर्माण होतो, असे पठाडे यांनी सांगितले.

- Advertisement -

असे मारता येतात खेकडे                                                                                                  धरणात एक ते दोन मीटर अंतरापर्यंत खेकडे छिद्रे करतात. पाण्याच्या रंगावरून हे छिद्रे लक्षात येतात. इथेलीन डायब्रोमाईड रसायन, शिजवलेला भात आणि गुळ यांचे मिश्रण करुन त्या छिद्रात टाकले जाते. हा पदार्थ खाल्ल्याने खेकडे मरतात. संशोधनासाठी ज्या दोन धरणांमध्ये हा प्रयोग केला गेला. तेथील खेकडे काही काळातच मृत झाल्याचे लक्षात आले.

एप्रिल ते जून प्रजनन कालावधी
खेकड्यांचा प्रजनन कालावधी एप्रिल ते जून महिन्यादरम्यान असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात ते बिळात जातात. त्यामुळे प्रजनन काळादरम्यान त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना होऊ शकतो.

- Advertisement -

खेकड्यांमध्ये कमालीची ताकद असते. शिवाय त्याच्या नांग्या इतक्या टणक आणि अणकुचीदार असतात की, ते दगडदेखील कोरू शकतात. वाघेरे आणि कुंडलिका डावा तट कालव्याच्या संशोधनातून ही बाब प्रकर्षाने पुढे आली होती. आमच्या संशोधनानुसार केलेल्या उपाययोजनांना यश आले होते. अशा संशोधनांची अंमलबजावणी शासनस्तरावरून होणे अपेक्षित आहे. अन्यत्र या संशोधनाची मदत घेतली गेल्यास किमानपक्षी गळतीचे प्रमाण तरी कमी होऊ शकते.
– नामदेव पठाडे, निवृत्त वैज्ञानिक संशोधन अधिकारी, मेरी

होय, खेकड्यांमुळे धरणगळती!
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -