घरताज्या घडामोडीसमान नागरी कायद्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी; नीलम गोर्‍हेंचा टोला

समान नागरी कायद्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका दुटप्पी; नीलम गोर्‍हेंचा टोला

Subscribe

नाशिक : समान नागरी कायद्याबाबत बाळासाहेबांची भूमिका ठाम होती. त्यामुळे समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर आपण भूमिका मांडावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. असे असतानाही त्यांनी दुटप्पी भूमिका घेत ड्राफ्ट आल्यानंतर बघू, असे सांगितले. एकनाथ शिंदे हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, अशा शब्दांत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी उद्धव टाकरेंना टोला लगावला.

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपसभापती नीलम गोर्‍हे शुक्रवारी (दि.१४) नाशिकमध्ये आल्या होत्या. त्यावेळी शिंदे गटाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, संपर्कनेते उत्तम महाजन, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, राजु लवटे, बंटी तिदमे, भाऊसाहेब तांबडे, रोशन शिंदेंसह शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

नीलम गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, अयोध्येत राममंदिराची उभारणी, समान नागरी कायद्यासाठी मोदींनी उचललेले पाऊल, देशाच्या विकासाचे मोदींनी स्वीकारलेले मॉडेल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामांचा धडाका पाहून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सामान्य जनतेच्या विकासाचे कार्यक्रम शिंदे-फडणवीस सरकार राबवित आहे. शासन आपल्या दारी असे जनताभिमुख उपक्रम राबवितानाच पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यावर या सरकारने लक्ष्य केंद्रित केले आहे. याशिवाय, पर्यटनवाडीच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर आणि वणी देवस्थानला शिंदे सरकारकडून निधी दिला जात आहे.

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. महिलांचे प्रश्न, महिला सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याची ग्वाही यावेळी नीलम गोर्‍हे यांनी दिली. मी विधान परिषदेच्या संवैधानिक पदावर असून, मला त्या चौकटीतीलच प्रश्न विचारा, असेही नीलम गोर्‍हे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केल्यानंतर तुम्ही संवैधानिक पदावर आहात तर पक्षाच्या कार्यालयात कशा आल्या, या प्रश्नावर त्यांनी मी विचाराने पक्षाची सभासद
असल्याचे सांगितले.

- Advertisement -

विधानसभेसाठी 100+ चे टार्गेट : दादा भुसे

मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत हजेरी लावत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भुसे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे 100+ टार्गेट असून त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शासन आपल्या दारी उपक्रमात 11 लाख लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार असून, यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. नाशिकमध्ये मुलींसाठी एनडीएचे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात लोकार्पण करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मोफत 75 शहर बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराला सव्वा कोटींचा दंड माफ करणार का, या प्रश्नावर त्यांनी असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले. शासन आपल्या दारी उपक्रमासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नाशिककरांनी 3 तास सहकार्य करावे, असे आवाहनही दादा भुसे यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -