घरक्राइमसिडकोत पुन्हा वाहनांची तोडफोड

सिडकोत पुन्हा वाहनांची तोडफोड

Subscribe

नाशिक : मोरवाडी येथील वाहनांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच शुभम पार्क सोसायटीमधून रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरीचा प्रयत्न फसल्याने दुचाकींची तोडफोड करत नुकसान केल्याची घटना घडली. दरम्यान, नवीन नाशिक परिसरात वाहन जाळपोळ, तोडफोडीचे प्रकार पुन्हा डोके वर काढत असून रहिवाशांत दहशत पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री शुभम पार्क येथील बिल्डिंग नंबर १ व बिल्डिंग नंबर ५ या ठिकाणी दोन ते तीन चोरट्यांनी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. दुचाकीचे लॉक तुटत नसल्याने सोसायटीमधून एमएच १५ जीबी १२०७ ही स्प्लेंडर ही दुचाकी फरफटत रस्त्यावर आणली, यानंतर तिची तोडफोड केली. त्यानंतर पुन्हा बिल्डिंग नंबर ५ येथे प्रमोद बोरकर यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५ डीपी ९१०६) सोसायटीत उभी असताना चोरट्याने ती चोरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, हाही प्रयत्न फसल्याने चोरट्यांनी दुचाकीची मोठी तोडफोड केली. यात दोन्हीही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

मुख्य म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असतानाही फिर्यादी तक्रार देण्यास गेला असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन नाशिक परिसरात पेट्रोल चोरी, दुचाकी चोरी, साखळी चोरी घरफोडी यांसह विविध चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे पोलीस गस्त सुरू असतानाही तोडफोड व अन्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -