घरक्राइमत्र्यंबक-नाशिक महामार्ग; खड्ड्यांमुळे वाढले अपघात अन् मृत्यू

त्र्यंबक-नाशिक महामार्ग; खड्ड्यांमुळे वाढले अपघात अन् मृत्यू

Subscribe

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने १५० कोटी रुपये खर्चून पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर हा राज्य महामार्ग तयार करण्यात आला. देशातील पहिला ग्रीन हायवे म्हणून त्याची मोठ्या प्रमणात जाहिरात केली गेली. मात्र, या महामार्गावरील अत्यंत मोठे अन् जीवघेणे खड्डे आता अपघातांना निमंत्रण देत असून, या अपघातांत मृत्यूमुखी पडणार्‍यांची आकडेवारी थक्क करणारी असल्याचे दिसून येते. नुकत्याच या मार्गावर खड्ड्यामुळे झालेल्या गंभीर अपघाताने आता पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न चर्चिला जात आहे.

त्र्यंबक रस्त्यावर टप्प्याटप्प्याने संपूर्ण अंतरावरच खड्डे पडलेले असल्याने या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्याची अत्यंत दूरवस्था झाली असल्याने रस्त्याच्या निकृष्ट कामाचा दर्जा उघड होऊन ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यात राज्यभरातून येणार्‍या भाविकांसह स्थानिकांना या खड्डेमय रस्त्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहेे. नाशिक-त्र्यंबक रस्ता तीन ठेकेदारांमार्फत या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, ठेकेदारांच्या बेफिकिरीमुळे झालेल्या कामाचे पितळ उघड पडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून, पडलेले खड्डे सतत बुजविण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न हास्यास्पद ठरत आहे. गत वर्षी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा आला की थातूरमातूर डागडुजी करून वारंवार खड्डे बुजविले जाते. त्यानंतर सतत वर्दळीमुळे खड्डे अल्पावधीत उखडले जात असून त्यामुळे दुचाकी घसरण्याचाही धोका वाढत आहे.

- Advertisement -

२ वर्षांत १३८ अपघात, ४६ मृत्यू

सर्व्हिस रोड, गतिरोधके नसल्याने हा रस्ता मुत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर २ वर्षांत अनेक जणांचा मृत्यू झालाय. त्र्यंबकेश्वर व सातपूर पोलीस ठाण्यांच्या नोंदींवरून दोन वर्षांत सुमारे १३८ अपघात होऊन ४६ जण मृत्यूमुखी पडले आहेत. मुख्य म्हणजे वरवरच्या डागडुजीमुळेही अपघातात वाढल्याचे दिसून येत आहे.

लाखो रूपये निधी मुरूमात!

रस्त्याचा साईट पट्ट्यावर मुरूम टाकण्याच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये अधिकार्‍यांच्या मर्जीतील ठेकेदार काढतो. परंतु गेल्या २ वर्षांत एकदाही साईटपट्ट्यांवर मुरूम टाकला नसल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. अशा अधिकार्‍यांची चौकशी होऊन दोषी आढळ्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लाखो रुपये खर्चून त्र्यंबक-नाशिक रस्ता तयार करण्यात आला. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामाने हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याची डागडुजी संशयास्पद होत आहे. याकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल. : कैलास मोरे, तालुकाध्यक्ष, रा.यु.काँ.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -