घरमहाराष्ट्रनाशिकलतादिदींना ‘डी. लिट’ देण्याचे मुक्त विद्यापीठाचे स्वप्न अपूर्ण

लतादिदींना ‘डी. लिट’ देण्याचे मुक्त विद्यापीठाचे स्वप्न अपूर्ण

Subscribe

आता लतादिदींना मरणोत्तर डी. लिट पदवी देण्याचे प्रयत्न सुरु

किरण कवडे, नाशिक :

प्रत्येक माणसाच्या हृदयावर अधिराज्य गाजविणार्‍या गानकोकिळा लता मंगेशकर यांना डी. लिट अर्थात डॉक्टर ऑफ लेटर्स या सर्वोच्च पदवीने सन्माणित करण्याची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची इच्छा अखेर अपूर्णच राहिली. सौंदर्यप्रधान गायकीने अवघ्या संगीत प्रतिभेलाच आपल्या कवेत घेतलेल्या लतादिदींचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण कलाक्षेत्राचा गौरव असल्याची मुक्त विद्यापीठाची भावना होती.

- Advertisement -

मुक्त विद्यापीठाच्या 23 व्या दीक्षान्त समारंभाचे औचित्य साधून ही पदवी मुक्त विद्यापीठाने फेब्रुवारी 2017 मध्ये जाहीर केली होती. यापूर्वी काव्यसूर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेविका शांताबाई दाणी तसेच मखमली गळ्याच्या गायिका आशा भोसले यांचा गौरव करण्यात आला आहे. डी.लिट. पदवी स्विकारण्याचे जाहीर केले तेव्हा लतादिदींचे वय 88 वर्षे इतके होते. त्यामुळे ही पदवी घेण्यासाठी त्या येऊ शकणार नाहीत, असे त्यांनी मुक्त विद्यापीठास कळविले होते.

मुंबई येथे होणार्‍या एका मोठ्या समारंभात त्यांना ही पदवी देण्याचे मुक्त विद्यापीठाचे नियोजन होते. परंतु, अनेकदा प्रयत्न करुनही हा योग जुळून आला नाही. त्यासाठी राज्यपालांच्या तारखेनुसार राजभवन किंवा सह्याद्री भवन येथेही डी. लिट सोहळा घेण्याचे प्रयत्न झाले; परंतु, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत गेल्यानंतर मुक्त विद्यापीठाला प्रयत्नही करता आले नाही. पाच वर्षांच्या अविरत प्रयत्नांनतरही मुक्त विद्यापीठाला लतादिदींना डी. लिट पुरस्काराने सन्माणित करण्यात यश आले नाही. रविवारी (दि.6) त्यांचे निधन झाल्यामुळे मुक्त विद्यापीठाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisement -

आता मरणोत्तरचे प्रयत्न

मुक्त विद्यापीठाने आता लतादिदींना मरणोत्तर डी. लिट पदवी देता येऊ शकते का? यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी काय नियम व निकष असतात याची चाचपणी केली जाणार असून, लतादिदींच्या प्रश्चात कोण ही पदवी स्विकारेल हा देखील महत्वाचा मुद्दा उपस्थित होणार आहे. त्यामुळे मुक्त विद्यापीठाची डी. लिट पदवी आता ‘डीलिट’ झाल्याचे बोलले जात आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -