घरमहाराष्ट्रमुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना केडीएमसी, उल्हासनगरमध्ये ‘नो एंट्री’

मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना केडीएमसी, उल्हासनगरमध्ये ‘नो एंट्री’

Subscribe

८ मे पासून प्रतिबंध

कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमधून मुंबईला कामासाठी येणार्‍या शासकीय व खासगी सेवेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ८ मेपासून मुंबई ते कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर अशी ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि उल्हासनगरचे महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशामुळे सरकारी आणि खासगी कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना सक्तीने कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. आताही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच कामावर जात आहेत. असे असताना या कर्मचार्‍यांना प्रतिबंध करण्याचे आदेश संबंधित महापालिका आयुक्तांनी काढल्याने पुन्हा सरकार यंत्रणेतील समन्वयाचा अभाव स्पष्ट झाला आहे. हे कर्मचारी कामावर येऊ शकले नाहीत तर त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर होण्याची दाट शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोनाबाधित रुग्णांची संख्या दोनशेपार झाली आहे. तर उल्हासनगरमध्ये करोनाचे १६ रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून मुंबईत शासकीय व खासगी सेवेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खासगी व सरकार कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाल्याच्या केसेस वाढत आहेत. त्यामुळेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने मुंबईत कामासाठी ये-जा करण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत शासकीय व खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी तसेच मुंबई महापालिकेमध्ये काम करणारे कर्मचारी यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या आस्थापनानजीकच्या हॉटेलमध्ये मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. मुंबईतील बँका, खासगी कंपन्या इतर आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी त्यांची व्यवस्था मुंबईत करून घ्यावयाची आहे अशी सुचनाही या दोन्ही पालिकेने केली आहे.

- Advertisement -

तसेच महापालिका क्षेत्रातून मुंबईला कामासाठी ये-जा करणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली नावे निवासाचा पत्ता कार्यालयाचा पत्ता भ्रमणध्वनी क्रमांक आधारकार्ड क्रमांक इत्यादी माहिती पालिकेला ईमेल आयडीवर पाठवावी असे आवाहन पालिकेने केले आहे. शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांसाठी ई मेल : [email protected] तर खासगी सेवेतील कर्मचार्‍यांसाठी ई मेल : [email protected] या ई मेलवर पाठविण्यात यावी. ठाणे जिल्ह्यातील सर्वत्रच करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बहुसंख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्याठिकाणी कामानिमित्त जात असतील त्याच ठिकाणी कुटुंबासहित त्यांची निवासाची, खाण्या पिण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच दररोज त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही काही दिवसांपूर्वी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -