अधिवेशनाचा पहिला दिवस, सत्ताधारी आणि विरोधक विधिमंडळात दाखल

राज्यात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने या न्यायालयीन संघर्षाच्या सावटाखाली आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात कांद्याचे घसरलेले दर, जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी दिलेली संपाची हाक, महागाई, बेरोजगारी, शेतकरी नुकसान भरपाई आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. याशिवाय कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची चिन्हे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांचं याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक विधीमंडळात दाखल झाले आहेत.