घरमहाराष्ट्रपवारांचा अजितदादांना पुन्हा चेकमेट!

पवारांचा अजितदादांना पुन्हा चेकमेट!

Subscribe

राष्‍ट्रवादीच्‍या आमदारांची लवकरच बोलावणार बैठक , लेक सुप्रियासह निष्ठावंतांना हाताशी घेत आमदारांच्‍या संपर्कात

जीवात जीव असेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना निक्षून सांगितले, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धूर्त खेळी करीत अशी कोंडी केली की अजित पवार यांच्यासमोर अशी भूमिका घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. अजितदादांसह पवारांनी भाजपलाही दुसर्‍यांदा शह दिला. पक्ष संघटना पुन्हा बांधू, महाविकास आघाडीचाच भाग म्हणून २०२४ ची निवडणूक लढवूया आणि पुन्हा सत्तेत येऊ, असा संदेशच स्वत: शरद पवार यांनी पक्षातील आमदारांना वैयक्तिकरित्या दिल्याची माहीती आपलं महानगरला उपलब्ध झाली आहे.

त्यामुळे मागील साडेतीन वर्षात शरद पवार यांनी दुसर्‍यांदा पुतण्या अजितदादांना चेकमेट करत पक्षावर आपलंच पूर्ण नियंत्रण असल्याची प्रचिती दिली आहे. आता अजितदादांनी पूर्णविराम केलेले बंड थंड बस्त्यात जाते की पुन्हा महिनाभरात अजितदादा यू-टर्न घेत भाजपशी संधान साधतील याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही. दरम्यान बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख आणि सुनील तटकरे यांनी देवगीरीवर अजितदादांची भेट घेत त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

- Advertisement -

शिवसेना आणि भाजपमध्ये २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी असंतोष धुमसत होता. त्यातूनच २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात न भूतो न भविष्यती अशी समीकरणे जुळून आली. दोन्ही काँग्रेसला बरोबर घेत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. यानिमित्ताने शरद पवार यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच ओघाने भाजपला धक्का दिला. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचेही महत्त्वाचे योगदान होते, तथापि त्यावेळी फडणवीस यांनीही शह-काटशहाचे राजकारण करीत अजित पवार यांना सोबत घेत सरकार स्थापन केले, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ते टिकू शकले नाही. त्यावेळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व १६२ आमदारांना ग्रॅण्ड हयातमध्ये एकत्र ठेवण्यात आले होते. अजित पवारांच्या मदतीने राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न शरद पवार यांनी उधळून लावला होता. शरद पवारांनी त्यावेळी भाजपबरोबरच अजित पवारांनाही शह दिला होता.

ईडी प्रकरणावरून पुतण्यावर कुरघोडी
राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आले, मात्र शरद पवारांनी सुरुवातीला त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली आणि नंतर आपण स्वत: यासंदर्भात ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दिवसभराचे राजकारण हे शरद पवार केंद्रितच राहिले. त्याचवेळी अजित पवार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आणि चर्चा अजित पवारांभोवती फिरू लागली. त्यातही शरद पवार यांनी लगेचच पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांना दु:ख झाले असावे. त्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याचे सांगितले. याद्वारे त्यांनी अजित पवारांवर कुरघोडी करीत आता त्यांना काय भूमिका घ्यावी लागेल याचेच स्क्रिप्ट शरद पवारांनी दिले.

- Advertisement -

पवारांनी राऊतांकडून केली दादांची कोंडी
आताही शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे, संजय राऊत तसेच पक्षातील आपल्या काही विश्वासू सहकार्‍यांना सोबत घेत अजित पवारांची कोंडी तर केलीच पण भाजपलाही शह दिला आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ११ एप्रिल रोजीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यातच अजित पवार यांची कोंडी करण्याची योजना आखली गेल्याचे सांगण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून सामनाच्या आपल्या रोखठोक या सदरात या बैठकीचा तपशील राऊतांनी मांडला. कोणालाही मनापासून पक्ष सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील, असे पवार-ठाकरे यांचे मत पडल्याचे राऊत यांनी नमूद केले आहे. त्यानंतर दोनच दिवसांत अजित पवारांना याबाबत खुलासा करीत जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगावे लागले होते.

शिवसेना फुटीचा फंडा राष्ट्रवादीसाठीही
भाजपला सत्तेबाहेर ठेवल्यामुळे भाजपने शिवसेना फोडत ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना हाताशी धरत मुख्यमंत्रीपद देवू केले. उद्धव ठाकरेंना जशास तसे उत्तरही दिले, पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आता त्याची सुनावणी पूर्ण झाली असून केव्हाही १६ आमदारांच्य अपात्रतेचा निकाल जाहीर होईल. त्या अनुषंगाने भाजपने पुन्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना आपल्या बाजूला फिरवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तरी अजितदादांना सोबत घेत शिवसेना फुटीचा फंडा वापरत राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण दादांनी त्याचा इन्कार केला.

पक्ष निरीक्षक आणि निष्ठावंतांची मदत
यादरम्यानच्या काळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी विविध जिल्ह्यांतील पक्ष निरीक्षकांशी थेट संपर्क साधून आपापला गड सांभाळण्याच्या सूचना दिल्या. नगर, नाशिक, पुणे, सोलापूरसह सातारा, सांगली, बीड या जिल्ह्यांतील आमदारांशी पक्ष निरीक्षक बोलल्याची आपलं महानगरकडे खात्रीलायक माहिती आहे. निरीक्षकांनी येत्या दोन दिवसांत शरद पवार हे तुमच्याशी बोलतील, असे आश्वासन सोमवारी आणि मंगळवारी दिल्याचे समजते. तसेच मुंबई, ठाणे, बुलडाणा या जिल्ह्यांतील आमदार पवारांचे कट्टर समर्थक असले तरी त्यांच्याशीदेखील संपर्क साधण्यात आला होता. राष्ट्रीयत्व गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीचे काम पुन्हा हाती घेणार असल्याचा शब्दही पवारांनी या निरीक्षकांना तसेच त्यांच्याद्वारे आमदार-पदाधिकार्‍यांना दिला. अशा रीतीने शरद पवार पुन्हा अजित पवारांवर भारी पडले. २०१९मध्ये विविध नाट्यमय राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊत म्हणाले होते की, शरद पवार समजून घेण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील. याचाच प्रत्यय शरद पवार वारंवार देत आहेत.

अजितदादा संपूर्ण दिवस देवगिरीवर
अजित पवार बुधवारी संपूर्ण दिवस देवगिरीवर होते. त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसमोर मांडलेली भूमिका ही केवळ स्वल्पविराम ठरू नये, त्या चर्चेला पूर्णविराम मिळावा, यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून झाल्याचे सांगण्यात येते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -