घरताज्या घडामोडीप्रा. हरी नरकेंच्या आठवणींनी छगन भुजबळांना फुटला हुंदका, अश्रु अनावर

प्रा. हरी नरकेंच्या आठवणींनी छगन भुजबळांना फुटला हुंदका, अश्रु अनावर

Subscribe

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक हरी नरके यांचे बुधवारी (दि. 9) दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई येथील भुजबळ नॉलेज सिटी (मेट) येथे  शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेस हरी नरके यांच्या आठवणींना उजाळा देताना अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अश्रु अनावर झाल्याचे बघायला मिळाले.

मुंबईत आयोजित शोकसभेत सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, पत्रकारिता, कला आदी क्षेत्र यांसह सर्वपक्षीय राजकीय मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत होते. ‘हरी तुला आम्ही तुला मरू देणार नाही, तू सुरु केलेलं काम आम्ही नेटाने पुढे नेऊ’ अशी भावनिक हाक भुजबळ यांनी दिली. हरी नरके हे  लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते होते. तब्बल 55 पेक्षा अधिक पुस्तके आणि शोधनिबंध लिहिले. देशासह जगभरातील 60 हून विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. त्यांचे विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते.

- Advertisement -

भुजबळ पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात लावला म्हणून लहान असताना ज्या हरी नरके यांना त्यांच्या मामांनी मारले होते. त्याच हरी नरके यांनी नामांतराच्या लढयात उडी घेतली आणि 22 दिवस ठाणे कारागृहात कारावास भोगला. आजही या मनुवादीवृत्ती फोफावत चालल्या आहेत असे दिसले तेव्हा प्रा. हरी नरके, उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे हे बाहेर पडले आणि महाराष्ट्र पिंजून काढत तब्बल 25 पेक्षा अधिक सभा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रा.हरी नरके हे आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन जगले. ते आम्हा सर्वांना पुरोगामी चवळीतला एक तेज:पुंज हिरा म्हणून स्मरणात राहतील अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी प्रा.हरी नरके यांच्या पत्नी संगीता, मुलगी प्रमिती व नरके कुटुंबीय, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ कुटुंबीय, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मेटमध्ये ग्रंथालय अन् शिष्यवृत्ती 

यावेळी प्रा.हरी नरके यांची सर्व ग्रंथ संपदा सुमारे 25 हजारांहून अधिक संपदा एकत्र करून मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे प्रा.हरी नरके यांच्या नावाने ग्रंथालय स्थापन करण्यात येईल. दरवर्षी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या इतिहास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, शोध पत्रकारिता, गरीब विद्यार्थी, फुले, शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर काम करणाऱ्या समाज सुधारक आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ता यांच्यासाठी एकत्रितपणे हरी नरके यांच्या नावाने 5 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -