घरताज्या घडामोडीरायगड जिल्ह्यात ७८४ कुपोषित तर ९८ तीव्र कुपोषित बालके, तीन महिन्यात कुपोषित...

रायगड जिल्ह्यात ७८४ कुपोषित तर ९८ तीव्र कुपोषित बालके, तीन महिन्यात कुपोषित बालकांची संख्या घटली

Subscribe

ग्रामीण भागात मुलांमध्ये कुपोषण आढळून येते. पुरेसा व योग्य पोषक आहार न मिळाल्यामुळे उद्भवणारे आजारपण व अशक्तपणा याला कुपोषण संबोधले जाते. रायगड जिल्ह्यात सध्या ७८४ कुपोषित बालके असल्याचे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आहे.

ऑगस्ट महिन्यात कुपोषित बालकांची शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये कुपोषित बालकांचा आकडा तिपटीने वाढल्याचे दिसून आले. मात्र, महिला बालकल्याण विभागाच्या उत्तम कामगिरीनंतर कुपोषित बालकांची संख्या २७५ ने घटली असल्याचे चित्र आहे. जानेवारी महिनाअखेर जिल्ह्यात ९८ तीव्र कुपोषित बालके तर ६८६ मध्यम कुपोषित बालके आहेत.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात डोंगरी, दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. यासह जिल्ह्यातील अनेक भागांत आदिवासी समुदाय देखील मोठ्या प्रमाणात आहे. योग्य काळजी न घेणे, योग्य आहाराचा अभाव आदी कारणांमुळे बालकांना कुपोषणाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये १०५९ बालके कुपोषित आढळली होती. यानंतर कुपोषण रोखण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली होती. जानेवारी २०२२ अखेर लहान ० ते ६ वयोगटातील १ लाख ५६ हजार ६४३ बालके सर्वेक्षित करण्यात आली आहेत.त्यामध्ये १ लाख ५० हजार ८५० बालके सर्वसाधारण, ६८६ बालके मध्यम कुपोषित तर ९८ बालके तीव्र कुपोषित आढळली.

कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने तीव्र व अतितीव्र कुपोषणाच्या श्रेणीत मोडणार्‍या बालकांची शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता व ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. आरोग्य विभाग आणि प्रमाणित उपकरणांच्या सहाय्याने नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य तपासणीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे तीन महिन्यात कुपोषणात घट झाली. नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील २७५ बालके कुपोषणमुक्त झाली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीता जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.

- Advertisement -

कर्जतमध्ये सर्वाधिक कुपोषण

जिल्ह्यातील सगळ्यात जास्त कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात ३ वर्षांपूर्वी मोरेवाडी या आदिवासी वाडीत सोनाली पादीर या १८ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुपोषित बालविकास विभागाचे पितळ उघडे पडले होते. त्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. मात्र,आजही जिल्ह्यात कर्जत तालुक्यात १८६ बालके कुपोषित आहेत. तर पेण तालुक्यात सगळ्यात कमी १० बालके मध्यम कुपोषित असून तीव्र कुपोषित एकही बालक नाही.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -