घरपालघररंजिताचा ठाण्यात रंगला 'सोहळा आनंदाचा 2023', 1500 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

रंजिताचा ठाण्यात रंगला ‘सोहळा आनंदाचा 2023’, 1500 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Subscribe

मुंबई : पालघरमधील रिल्स-व्हिडीओफेम रंजिताने शनिवारी (24 जून 2023) ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये खास महिलांसाठी ‘सोहळा आनंदाचा 2023’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधवा महिलांकडून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील सुमारे 1500 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सध्या सोशल मीडियाने प्रत्येकाला वेड लावले आहे. ‘ती किंवा तो सध्या काय करत असेल?’ एखाद्या मालिकेत नट-खलनायकाची आजची काय डेव्हलपमेंट आहे, याची सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या दिवसभराच्या उपक्रमांची माहिती घेण्याची सवय अनेकांना लागली आहे. अशाच लाखो नेटिझन्सना पालघरमधील रंजिताच्या दिनक्रमाच्या रिल्स-व्हिडीओने जणू वेड लावले आहे. अनेकांना रंजिता पाटील हे नाव नवीन नसावे, कारण तिच्या सब्सक्रायबर्स आणि फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

- Advertisement -

याच रंजिताने विनामूल्य आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मंगळागौरचे खेळ, लावणी, डान्स, मनोरंजनात्मक खेळ आणि सोबतच मानाची पैठणी, सोन्याची नथ अशी भरघोस बक्षिसे महिलांनी जिंकली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला मराठी चित्रपटातील स्टार कलाकारही उपस्थित होते. याव्यतिरिक्त महिला पोलीस अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस, महिला रिक्षा चालक, महिला सफाई कामगार, घरगुती पदार्थ विकणाऱ्या ताई, महिला डॉक्टर अशा विविध क्षेत्रांतील महिलांचा येथे सन्मान करण्यात आला. गडकरी रंगायतनमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाचा रंजिताच्या Crazy Foody Ranjita ह्या Youtube चॅनेलवर लाखो दर्शकांनी घरबसल्या आनंद लुटला.

- Advertisement -

बोईसर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या रंजिताने सुरुवातीला एका विकासकाकडे नोकरी केली. याच कालावधीत ब्यूटीशीयनचा कोर्स करून तिने स्वत:चे सलोन काढले. 2011 साली मूळ पडघे (उमरोळीजवळ) येथील पालघरला राहणाऱ्या रोहनशी विवाहबद्ध झाली. 2016 साली ओवीच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर नोकरी सोडून सलोनच्या व्यवसायाकडे रंजिताने लक्ष केंद्रित केले. 2018 नंतर यूट्यूबच्या चॅनलच्या निमित्ताने पालघर- बोईसर व परिसराकरिता मर्यादित ओळख असलेल्या रंजिताचे जगभरात चाहते निर्माण झाले. रंजिताने आजवर विविध स्तरावर सामाजिक कार्य, आर्थिक योगदान दिले आहे. महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत.

रंजिताच्या ‘क्रेझी फूडी रंजिता’ (crazyfoodyranjita) या यूट्यूब चॅनेलचे तब्बल 5 लाख 80 हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर 1 लाख 10 हजारांचा टप्पा तिने ओलांडला आहे. तिचे अनेक व्हिडीओ 10 ते 20 लाख लोकांनी पाहिले आहेत. चटपटीत आणि खुमासदार रिल्स-व्हिडीओमुळे रंजिता आज अनेकांच्या कुटुंबातील अप्रत्यक्ष सदस्य बनली आहे.

आपल्या रिल्स-व्हिडिओच्या माध्यमातून रंजिता केवळ पालघर नव्हे तर, जगभरात पोहोचली आहे. रंजिताचा पालघर जिल्ह्यातील खाद्य पदार्थ, सौंदर्य स्थळे, शुक्रवारचा आठवडा बाजारातील गंमती-जंमतीसह सुरू झालेला प्रवास आता संपूर्ण महाराष्ट्रासोबत दुबईपर्यंत पोहोचला आहे. नऊवारी नेसून बुर्ज खलिफामध्ये जाण्यापासून ते झी मराठीच्या शोमध्ये परीक्षण करण्यापर्यंत रंजिताने मजल मारली आहे. रंजिताला नुकताच Earth NGOतर्फे सन्मान महाराष्ट्राचा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महिलांमध्ये शक्ती असते आणि तिचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होईल, असा रंजिताला विश्वास आहे. समाजाकडून, कुटुंबाकडून कोणत्याही कामामध्ये पाठबळ मिळविण्यासाठी मर्यादा असतात. पण जिद्द, चिकाटी आणि सबुरी, सहनशीलता ठेवल्यास यशस्वी होण्यासाठी अनेक शिखरे त्यांना साद देतील, असे तिला वाटते. याच आत्मविश्वाासातून रंजिता आज जग मुठीत करू पाहत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -