घरमहाराष्ट्ररायगडात पाण्याची झळ, धरणांनी गाठला तळ !

रायगडात पाण्याची झळ, धरणांनी गाठला तळ !

Subscribe

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. पिण्याचे पाणी हे त्यापैकी एक असून जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. पावसाळा वेळेत सुरू झाला नाही तर जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणीचा तुटवडा जाणवू लागला असून मे महिन्यात पाणीसंकट उद्भवणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या सर्वच नेते, प्रशासन अधिकारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहेत, तर दुसरीकडे वातावरणातील वाढत्या उष्णतेचा परिणाम धरणांतील पाण्याच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयातील उपयुक्त पाणी साठ्याची तुलनात्मक स्थिती पाहिली तर 30.59 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत 37.13 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता, तर यावर्षी 30.59 एवढाच पाणीसाठा धरणांत शिल्लक आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल संपण्यापूर्वी जवळ-जवळ 6.54 टक्के एवढा कमी साठा शिल्लक आहे. पावसाळ्यातील पाण्याचा साठा व्यवस्थित झाला नाही तर भविष्यात तीव्र पाणीटंचाई भासेल.

- Advertisement -

जिल्ह्यातील 28 पैकी 4 धरणांत 50 टक्के, तर दोन धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये म्हसळे तालुक्यातील पाभरे व सुधागड तालुक्यातील उन्हेरे या दोन धरणांत उपयुक्त पाणी शून्य टक्के आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणात फक्त 6 टक्के, तर महाड तालुक्यातील वरंध 11 टक्के, महाड तालुक्यातील खैरे व कर्जत तालुक्यातील साळोख या धरणात 13 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

15 ते 19 टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेल्या धरणांत महाड तालुक्यातील खिंडवाडी व कोथुर्डे, 20 ते 30 टक्के मुरुड तालुक्यातील फणसाड, अलिबाग तालुक्यातील तीनवीरा, श्रीगाव, सुधागड तालुक्यीतल कोंडगाव व कवेळे, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, खालापूर तालुक्यातील डोणवत, उरण तालुक्यातील पुनाडे, पनवेल तालुक्यातील मोरबे यांचा, तर 31 ते 40 टक्के सुधागडमधील घोटवडे, श्रीवर्धनमधील कुडकी, म्हसळ्यातील संदेरी, खालापूरमधील भिलवले व कलोते-मोकाशी, पनवेलमधील बामणोली धरणाचा समावेश आहे.

- Advertisement -

सुधागडमधील ढोकशेत धरणात 41 टक्के, तळेमधील वावा 56 टक्के, रोहे येथील सुतारवाडी 53 टक्के, अवसरे धरणात 54 टक्के, पेण येथील आंबेघर धरणात 56 टक्के, तर सर्वाधिक पाणीसाठी असलेल्या पनवेल तालुक्यातील उसरण धरणात 81 टक्के उपयुक्त पाणी साठा असल्याचे रायगड पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

पाटबंधारे विभागाच्या 28 धरणांपैकी सुधागड तालुक्यात 5, महाड तालुक्यात 4, श्रीवर्धन, महाड, खालापूर तालुक्यात प्रत्येकी 3, उरण, पेण, मुरुड, तळे, अलिबाग व रोहे प्रत्येकी 1, तर म्हसळे, कर्जत प्रत्येकी 2 धरणे आहेत. तरीही पाणीटंचाईचे सावट जानेवारी महिन्यापासूनच उद्भवते. दरवर्षी पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागते.

राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय अधिकारी यांचा योग्य समन्वय साधला गेला तर आणि जनतेनेही लोकप्रतिनिधींच्या मागे लागून प्रलंबित धरणांची कामे करून घेतल्यास तसेच पावसाळ्यात योग्य रितीने पाण्याचा साठा केला तर पाणीटंचाई दूर होऊ शकते. मात्र पाणी प्रश्न कुणीच गांभीर्याने घेत नसल्याचेच चित्र सर्वत्र दिसत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकही जबाबदार असल्याचे मला वाटते. -विकास राणे, सामाजिक कार्यकर्ते

-हर्षल मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -