घरमहाराष्ट्रनागपूर हॉस्पिटलमध्ये तोडफोड, डॉक्टर जाणार संपावर!

नागपूर हॉस्पिटलमध्ये तोडफोड, डॉक्टर जाणार संपावर!

Subscribe

नागपूरच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सुरक्षेसाठी बंदूकीचा परवाना मिळावा अशी मागणी देखील केली आहे.

नागपूरच्या इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बुधवारी एका महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी एमआयसीयूची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनी सुरक्षेचा उपाय म्हणून ‘बंदूक वापरण्याची परवानगी द्या, अन्यथा काम बंद आंदोलन’, करण्याचा इशारा दिला आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी हा इशारा दिला आहे. सुरक्षेसाठी वारंवार मागणी करूनही सरकार या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे, शनिवारी काम बंद आंदोलन केलं जाणार असल्याचं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एमआयसीयूमध्ये तोडफोड

बुधवारी एका महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या नातेवाईकांचा संताप झाला. रागाच्या भरात १० ते १५ जणांनी एमआयसीयूमध्ये घुसून तिथल्या वस्तूंची तोडफोड केली आणि तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना अपशब्द वापरले. काही दिवसांपूर्वी देखील हातात तलवारी घेऊन काहीजण हॉस्पिटलमध्ये घुसले होते. याच्याच निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी शनिवारी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -
Indira Gandhi Hospital
नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात तोडफोड

सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नाही!

याविषयी अधिक माहिती देताना केंद्रीय मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश कुमार चिरवटकर यांनी सांगितलं की, “नागपूरच्या या मेडिकल कॉलेजमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत. ज्या सिस्टीम पुरवल्या जाणार आहेत, त्या देखील पुरवल्या जात नाहीत. पास, अलार्म, सीसीटीव्ही यापैकी कोणतीही सिस्टीम या कॉलेजमध्ये नाही‌. त्यामुळे, डॉक्टरांनाच स्वत:ची सुरक्षा करावी लागत आहे. आणि त्यासाठी आम्हाला आमच्या
सुरक्षेसाठी बंदूक बाळगण्याची परवानगी द्यावी.”

निवासी डॉक्टर खरंच सुरक्षित आहेत?

मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नागपूरच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या या संपाचं होणार काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -