सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर

hsc result

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) नुकताच सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. त्यापाठोपाठ आता आयसीएआयने गुरुवारी सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत औरंगाबादमधील राजन काब्रा ८३.२५ टक्के गुण मिळवत देशातून अव्वल आला, तर निष्ठा बोथ्रा हिने ८२.२५ टक्के आणि नागपूरचा कुणाल हरद्वानीने ८०.३८ टक्के गुण मिळवून अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.

आयसीएआयने सीए इंटरमिडिएट परीक्षा १५ ते ३० मेदरम्यान, तर १४ ते २९ मेदरम्यान सीए अंतिम आणि २३ ते २९ मेदरम्यान सीए फाऊंडेशनची परीक्षा घेतली होती. यातील सीए अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच आयसीएआयने जाहीर केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी सीए इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला ग्रुप १ मध्ये ८० हजार ६०५ परीक्षार्थी बसले होते. त्यातील १० हजार ७१७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून या ग्रुपचा निकाल १३.३० टक्के इतका लागला. त्याचप्रमाणे ग्रुप २साठी ६३ हजार ७७७ परीक्षार्थी बसले होते.

त्यातील ७९४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल १२.४५ टक्के इतका लागला. ग्रुप १ व ग्रुप २ अशा दोन्ही ग्रुपला देशभरातून २४ हजार ४७५ परीक्षार्थी बसले होते. त्यातील १३३७ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेचा निकाल ५.४६ टक्के इतका लागला. या परीक्षेत औरंगाबादमधील राजन काब्राने ८०० पैकी ६६६ गुण मिळवत ऑल इंडिया स्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. परीक्षार्थींना त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.